'द काश्मीर फाइल्स' चित्रपटाविरोधात कमेंट करणं एका व्यक्तीला महागात पडलं आहे. संतप्त झालेल्या नागरिकांनी संबंधित व्यक्तीला मंदिरात बोलावून नाक घासायला लावलं आणि माफी देखील मागायला लावली, अशी माहिती समोर आली आहे. याचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. दरम्यान, यासंदर्भात एक युवकही पुढे आला असून यासंदर्भात भिवाडी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करणार असल्याचंही म्हटलं आहे.
अल्वरमधील बेहरोरच्या गोकुलपूरमध्ये ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. राजेश हा एका खासगी बँकेत सिनिअर सेल्स मॅनेजर पदावर कार्यरत आहे. चार दिवसांपूर्वी त्यानं फेसबुकच्या माध्यमातून 'द काश्मीर फाइल्स' चित्रपटावर भाष्य केलं होतं. चित्रपटात काश्मिरी पंडितांवरील अत्याचाराचे चित्रण करण्यात आले आहे, पण इतर जातींवरही अत्याचार झाले आहेत. पाली येथील जितेंद्र पाल मेघवाल यांनाही तडीपार करण्यात आलं होतं, अशी कमेंट राजेश यांनी केली होती. चित्रपटावरील टिप्पणीनंतर हे प्रकरण आणखी वाढलं. मंगळवारी काही लोकांनी स्थानिक मंदिरात बैठक बोलावली आणि यामध्ये राजेशलाही बोलावण्यात आलं होतं. त्यानं केलेल्या कमेंटबाबत त्याला सर्वांची माफी मागण्यास सांगण्यात आलं. तसंच देवासमोर नाक घासण्यासही भाग पाडण्यात आलं. याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.
प्रकरण आणखी वाढल्यामुळे राजेश यांनी ऑनलाइन येऊन माफी मागितली होती. मंगळवारी त्यांनी पुन्हा गावकऱ्यांसमोर हात जोडून माफी मागितली. बळजबरीनं नाक घासायला लावल्याचा आरोप राजेश यांनी केला आहे. आता ते काही लोकांसह भिवाडी एसपींची भेट घेऊन कारवाईची मागणी करणार आहेत. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर बेहरोर पोलिस ठाण्यात रात्री उशिरा ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये नवदीप, साजित यादव, हेमंत शर्मा, अजय शर्मा, नितीन जांगीड, प्रशांत यादव, रामुतर यादव, परबिंद, लीलाराम, कुलदीप यादव, मुलायम सिंह यांचा समावेश आहे. या सर्वांवर छळ करणे, मारहाण करणे, जातिवाचक शब्दानं अपमान करणं आणि इतर आरोप आहेत. बेहरोरचे डीएसपी आनंद राव या प्रकरणाचा तपास करत आहेत.
"जय भीम चित्रपट करमुक्त का करण्यात आला नाही, हे मी लिहिलं होतं. यावर जय श्री राम आणि जय कृष्णाच्या प्रतिक्रिया आल्या. हे पाहून संतापाच्या भरात कमेंट केली होती. मी नास्तिक आहे. माझा मूर्तिपूजेवर विश्वास नाही. माझ्या पोस्टवर लोक जय श्री राम आणि श्री कृष्ण लिहितात. मी जय भीम लिहितो", असं राजेश यांनी म्हटलं आहे.