भोपाळ : मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीतभाजपा नेते शिवराज सिंह चौहान यांनी पार्टीचा पराभव स्वीकारला आहे. जनतेने आम्हाला बहुमतापासून लांब ठेवल्यामुळे आम्ही राज्यात पुन्हा सरकार स्थापन करण्याचा दावा करणार नाही, असे शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले.
शिवराज सिंह चौहान यांनी बुधवारी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सादर केल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, विधानसभा निवणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. या निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी फक्त माझी आहे. भाजपा कार्यकर्त्यांनी चांगले काम केले. कोठे-ना-कोठे तरी कमतरता राहिली. याविषयी चर्चा करण्यात येणार आहे.
मध्य प्रदेशात13 वर्षे लोकांसाठी काम करण्याची संधी मिळाला. यासाठी सर्वांचा आभारी आहे. माझ्या कोणत्या कामामुळे, शब्दामुळे राज्यातील साडे सात कोटी जनतेच्या मनाला ठेस पोहोचली असेल, तर मी त्याबद्दल जनतेची माफी मागतो. आमच्या सरकारने मध्य प्रदेशात चांगली कामे केली आहे. त्यामुळे आम्ही सुरु केलेल्या योजना चांगल्याप्रकारे येणाऱ्या सरकारने पुढे नेण्यात याव्या, असा आग्रह करत शिवराज सिंह चौहान यांनी काँग्रेसचे अभिनंदन केले.
याचबरोबर, आता यापुढे आम्ही विरोधी पक्षाची भूमिका निभावणार आहे. विरोधी पार्टी सुद्धा मजबूत आहेत. आमच्याकडे 109 आमदार आहेत. तसेच, माझी चौकीदारी आजपासून सुरु झाली असल्याचेही शिवराज सिंह चौहान यावेळी म्हणाले.