ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३० - काही वर्षांपूर्वी एका चाहत्याला थोबाडीत मारल्याप्रकरणी त्या चाहत्याची माफी मागावी असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने अभिनेता गोविंदाला दिला आहे. एखाद्या फिल्मस्टारने सार्वजनिक ठिकाणी मारामारीसारखी कृत्य करु नयेत, असं निरीक्षण नोंदवत न्यायालयाने हे आदेश दिले.
२००८ साली एका चित्रपटाच्या सेटवर गोविंदाने संतोष रॉय या चाहत्याच्या कानशीलात लगावली होती. अभिनेता बनण्याच्या इच्छेने मुंबईत आलेल्या संतोष यांनी 'या घटनेनंतर' आपले आयुष्य उध्वस्त झाल्याचे म्हटले होते. तसेच जोपर्यंत न्याय मिळणार नाही, तोपर्यंत ही कायदेशीर लढाई सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला होता.
न्यायालयातील सुनावमीदरम्यान न्या. जी. एस. ठाकूर यांच्या खंडपीठाने गोविंदाने चाहत्याच्या कानशीलात लगावल्याचा व्हिडिओ कोर्टात पाहिला. त्यानंतर गोविंदातच्या वर्तणुकीवर आक्षेप नोंदवत 'पब्लिक फिगरने असे कृत्य करणे चुकीचं आहे' अस मतही न्यायालयाने नोंदवलं. ' अभिनेता रील लाईफमध्ये जसा जगतो, तसं रिअल लाईफमध्ये वागू नये' असे सांगत न्यायालयाने त्याला हे प्रकरण कोर्टाबाहेर सोडवण्याबाबत विचारणा केली होती.
अखेर आज सर्वोच्च न्यायालयाने गोविंदाला चाहत्याची माफी मागण्याचे आदेश दिले.