ऑनलाइन लोकमत
बेंगळूर, दि. १९ - एका ऑस्ट्रेलियन पर्यटक तरुणाने पायावर देवी यल्लमाचा टॅटू काढलेला बघून स्थानिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आणि त्यांनी त्या तरूणाला व त्याच्यासोबतच्या तरुणीला जाब विचारल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे स्थानिक पोलीसांनी हिंदूंच्या भावना दुखावल्याचे सांगत सदर तरूणाला माफी मागण्यास भाग पाडल्याचे वृत्त आहे. शनिवारी एका हॉटेलमध्ये ऑस्ट्रेलियन जोडपे बसलेले होते. त्याच्या पायावर यल्लमाचा टॅटू बघून स्थानिकांनी त्यांना जाब विचारला तसेच कातडी सोलून टॅटू काढण्याची धमकी दिल्याचे वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटले आहे.
मॅथ्यू गॉर्डन व एमिली कासिनाउ असे या जोडप्याचे नाव असून तो गॉर्डन कायद्याचा विद्यार्थी आहे. जवळपास २५ जणांचा समूह गोळा झाला आणि त्यांनी कातडी सोलून टॅटू काढण्याची धमकी दिल्याचे गॉर्डनने सांगितले. स्थानिक पोलीसांनी सगळ्यांना पोलीस ठाण्यात नेले आणि त्या जोडप्याला हिंदू धर्माच्या मूल्यांची माहिती दिल्याचे तसेच मॅथ्यूकडून लेखी माफी लिहून घेतल्याचे एमिलीने सांगितले.
दरम्यान, पोलीस उपायुक्तांनी हा किरकोळ वाद होता आणि तो सामंजस्याने मिटल्याची प्रतिक्रिया दिली आहे.