नवी दिल्ली, दि. 7- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा मुखवटा घातलेल्या एका ग्रुपचा फोटो शेअर करणं ‘प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया’ (पीटीआय) या वृत्तसंस्थेला महागात पडलं आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांनी ‘पीटीआय’च्या या फोटोंवर आक्षेप घेतल्यानंतर ते फोटो पीटीआयने डिलिट केले आहेत. हे फोटो शेअर केल्याने पीटीआयने स्मृती इराणींची माफीही मागितली आहे. जनतेच्या भावना दुखावल्याबद्दल माफी मागत असल्याचं पीटीआयने ट्विटमध्ये म्हंटलं आहे.
नितीश कुमार यांनी केंद्राकडे निधीची मागणी केली होती. या बातमीचं ट्विट पीटीआयने केलं होतं. हे ट्विट करताना पीटीआयने नरेंद्र मोदी आणि नितीशकुमारांचा मुखवटा घातलेली मंडळी फ्रेंडशिप डे साजरा करतानाचा फोटो शेअर केला. पण हा फोटो माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांना आवडला नाही. हा फोटो शेअर केल्यानंतर स्मृती इराणी यांनी ट्विटरवरच ‘पीटीआय’ला खडे बोल सुनावले. जनतेने निवडून दिलेल्या नेत्यांची तुम्ही अशी प्रतिमा निर्माण करणार का, ही तुमची अधिकृत भूमिका आहे का असा सवाल त्यांनी विचारला. यानंतर पीटीआयने भावना दुखावल्याबद्दल स्मृती इराणींची माफी मागितली आणि फोटो डिलीट केले आहेत.
पण यावर नेटीझन्सने मात्र नाराजी व्यक्त केली. मुखवटा घातलेल्या फोटोमध्ये आक्षेपार्ह काय? असा सवाल उपस्थित केला जातो आहे. गौरव पांधी या युजरने पीटीआयचे ते फोटो पुन्हा ट्विट करत यात आक्षेपार्ह काय आहे असा प्रश्न उपस्थित केला. स्मृती इराणी पीटीआयच्या कामात हस्तक्षेप का करत आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
पीटीआयने याआधीही स्मृती इराणींची माफी मागितली होती. मुसळधार पावसाने अहमदाबादचं सरदार पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ पाण्यात बुडाल्याचं आणि विमाने पाण्यावर तरंगत असल्याची ओळ देऊन ‘पीटीआय’ने अहमदाबाद विमानतळाचे फोटो प्रसिद्ध केले होते. विश्वासार्ह पण ते फोटो अहमदाबादमधील नसून २०१५ मधील चेन्नई विमानतळाची असल्याचं नंतर समोर आलं होतं. स्मृती इराणींनी ही चूक लक्षात आणून दिल्यानंतर पीटीआयला माफी मागावी लागली होती. या प्रकरणावरून पीटीआयच्या एका फोटोग्राफरला कामावरून काढून टाकण्यात आलं होतं.