जम्मू : काश्मिरी पंडित आणि इतर विस्थापितांच्या ‘घरवापसी’साठी पोषक वातावरण निर्माण करण्याचा आणि त्यांनी पुन्हा काश्मिरात यावे, असे आवाहन करणारा ठराव गुरुवारी जम्मू आणि काश्मीर विधानसभेत एकमताने संमत करण्यात आला. सकाळी सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पक्षीय राजकारण बाजूला सारत काश्मिरी पंडित आणि इतर विस्थापितांना खोऱ्यात परत आणण्याचा ठराव संमत करण्यात यावा, अशी भूमिका मांडली. नॅशनल कॉन्फरन्सचे कार्यकारी अध्यक्ष असलेले ओमर म्हणाले की, २७ वर्षांपूर्वी काश्मिरातील दुर्दैवी परिस्थितीमुळे काश्मिरी पंडित, शीख आणि काही मुस्लिमांना इतरत्र विस्थापित व्हावे लागले. त्यांनी खोरे सोडण्यास आज २७ वर्षांचा काळ लोटला आहे. त्यांच्या पुनरागमनासाठी आम्ही राजकारण बाजूला ठेवून सभागृहात ठराव मंजूर करायला हवा, असेही ओमर यांनी म्हटले. प्रश्नोत्तराचा तास संपत आल्यानंतर ठराव सभागृहात मांडण्यात मंजुरी दिली. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी हा ठराव सभागृहात मांडला. तो संमत करण्यात आला. (वृत्तसंस्था)
काश्मिरी पंडितांना घरवापसीचे आवाहन
By admin | Published: January 20, 2017 5:57 AM