ऑनलाइन लोकमत
भोपाळ, दि. 16 - सध्या सर्व राजकीय पक्षांमध्ये राष्ट्रपती निवडणुकीची चर्चा सुरु असून त्यासाठी लागणा-या आकडेवारीची जुळवाजुळव सुरु आहे. राष्ट्रपतीपदाची उमेदवारी कोणाला मिळेल याची उत्सुकता सर्वांना लागली असून यासाठी राजकीय पक्षांच्या भेटीगाठी सुरु झाल्या आहेत. एकीकडे राजकीय घडामोडी घडत असताना ग्वालिअरमधील एका चहावाल्याने राष्ट्रपती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला आहे. बरं आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांनी राष्ट्रपती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. निवडणूक लढण्याची किंवा हारण्याची हौस म्हणा हवं तर, पण 49 वर्षीय आनंद सिंह कुशवाहा यांनी उमेदवारी अर्ज भरण्याची ही चौथी वेळ आहे.
आनंद सिंह कुशवाहा आतापर्यंत 20 निवडणुका हारल्या आहेत. ग्वालियर येथे राहणा-या आनंद यांनी 1994 पासून निवडणूक लढण्यास सुरुवात केली. आपण कोणकोणत्या निवडणुका लढलो हेदेखील त्यांच्या चांगलंच लक्षात आहे. त्यांनी उपराष्ट्रपतीपदाची निवडणूकही लढली आहे.
"मी उत्तर प्रदेशातील खासदार आणि आमदारांच्या संपर्कात आहे. याआधी मला गरज हवी होती तितकी मतं मिळाली नाहीत, पण यावेळी समर्थन मिळेल असा विश्वास आहे", अशी प्रतिक्रिया आनंद सिंह कुशवाहा यांनी दिली आहे.
आनंद सिंह कुशवाहा नेहमी आपल्या कमाईतील एक भाग निवडणूक लढण्यासाठी बाजूला ठेवतात. 2013 विधानसभा निवडणुकीत आनंद सिंह कुशवाहा यांना 376 मतं मिळाली होती. त्यांनी सांगितलं की, "मला किमान एकदा तरी यशस्वी व्हायचं आहे. चारचाकी परवडत नसल्याने मी पायी चालतच प्रचार करत असतो. जेव्हा मी प्रचारासाठी बाहेर पडतो तेव्हा माझी बायको चहाचं दुकान सांभाळते". 2014 लोकसभा निवडणुकीत दाखल करण्यात आलेल्या नामांकन अर्जानुसार, कुशवाहा यांच्याकडे 5000 रुपये रोख आणि 10 हजारांची स्थायी संपत्ती आहे.