ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 21 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या कामकाजात होत असलेला उशीर यावरुन नाराजी व्यक्त केली असून सर्व भाजपा खासदारांना संसदेत हजर राहण्याचा आदेश दिला आहे. 'मी कोणत्याही क्षणी कोणालाही बोलावू शकतो', असं सांगत मोदींनी एकाप्रकारे सर्व खासदारांना तंबीच दिली आहे. भाजपाच्या संसदीय बैठकीत बोलताना मोदींनी खासदारांना संसदेत उपस्थित राहणं तुमची जबाबदारी असल्याचं सांगितलं आहे.
संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांनी बोलताना संसदेतील अनुपस्थितीचा मुद्दा उपस्थित केला असता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यासाठी खासदारांना विनंती करण्याची गरज नसून ही त्यांची मुलभूत जबाबदारी असल्याचं म्हटलं आहे.
भाजपा नेत्याने दिलेल्या माहितीनुसार मोदींनी सांगितलं आहे की, 'तुम्ही कुठेही असा मला त्याच्याशी काहीही घेणं देणं नाही. सेंट्रल हॉल जिथे खासदारांच्या चर्चेसाठी बैठका होत असतात अगदी तिथेही असाल तरी फरक पडत नाही. तुम्ही हाऊसमध्ये हजर असलं पाहिजे'. 'मी तुम्हाला कोणत्याही क्षणी बोलावू शकतो', असंही मोदी बोलले आहेत. हे सांगताना मोदींच्या बोलण्यातून पुर्णपणे नाराजी जाणवत होती असंही या नेत्याने सांगितलं आहे.
याआधीही मोदींनी संसदेत खासदारांना उपस्थित राहण्याचा आदेश दिला होता. पण पहिल्यांदाच त्यांनी इतक्या सविस्तरपणे याबद्द्ल सांगितलं आहे. 'आपल्या मतदारसंघातील लाखो लोकांचा प्रतिनिधी असल्याच्या नात्याने संसदेच्या कामकाजात सहभागी होणं कर्तव्य असल्याचं', मोदी बोलले आहेत.