नवी दिल्ली:दिल्लीपोलिसांच्या हाती मोठे यश आले आहे. 'सुपर चोर' बंटी उर्फ देवेंद्र पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. दिल्लीच्या दक्षिण जिल्हा पोलिसांनी बंटीचा 500 किमी अंतरावर असलेल्या कानपूरपर्यंत पाठलाग करुन त्याला अटक केली. अलीकडेच ग्रेटर कैलासमधील दोन घरांमध्ये चोरी झाली होती, ज्यामध्ये बंटीचे नाव समोर आले होते. बंटीवर एक चित्रपटही बनला आहे. तसेच, तो बिग बॉसमध्येही झळकला होता.
देवेंद्र सिंह उर्फ 'बंटी चोर' उर्फ 'सुपर चोर' याच्यावर देशभरात 500 हून अधिक चोरीच्या घटनांची नोंद आहे. त्याला अनेक प्रकरणांमध्ये शिक्षाही झाली आहे. 2010 मध्ये बंटी 3 वर्षांची शिक्षा भोगून तुरुंगातून बाहेर आला, तेव्हा तिने सुधारणार असल्याचे वचन दिले. यानंतर तो बिग बॉसमध्येही सहभागी झाला होता. मात्र वर्षभरानंतर तो पुन्हा एका चोरीच्या घटनेच्या सीसीटीव्हीमध्ये दिसला. यानंतर त्याने पुन्हा चोऱ्या करण्यास सुरुवात केली.
केरळची राजधानी तिरुअनंतपुरममध्ये एका अनिवासी भारतीय व्यावसायिकाच्या घरात चोरी केल्याप्रकरणी त्याला 10 वर्षांची शिक्षाही झाली आहे. ही चोरी 2013 मध्ये झाली होती. बंटीने व्यावसायिकाच्या घरातून 28 लाख रुपये किमतीची एसयूव्ही कार, लॅपटॉप आणि दोन मोबाईल चोरले होते. या हायटेक चोरीच्या 6 दिवसानंतर केरळ पोलिसांनी त्याला पुण्यातून अटक केली.
बंटी सुपर चोर एका खास पॅटर्नमधून चोरी करतो. त्यावर 'ओय लकी ओये' चित्रपटही बनवण्यात आला आहे. या चित्रपटात बंटीची भूमिका अभिनेता अभय देओलने साकारली आहे. खोसला का घोसला सारखे हिट चित्रपट देणाऱ्या दिबाकर बॅनर्जी यांनी हा चित्रपट बनवला आहे.
बंटी सुपर चोरच्या पॅटर्नबद्दल काही खास गोष्टी...
1. बंटी पहाटे 2 ते 6 या वेळेतच सर्व चोरी करायचा.
2. चोरीपूर्वी घरात प्रवेश करण्यासाठी बंटी लांब स्क्रू ड्रायव्हरच्या साहाय्याने दरवाजा किंवा खिडकीची ग्रील उघडत असे.
3. बंटी नेहमी आलिशान कार, दागिने, कटलरी, परदेशी घड्याळे आणि प्राचीन फर्निचर यांसारख्या महागड्या वस्तूंवरच हात साफ करायचा. चोरीच्या वस्तूंमध्ये कधीही क्षुल्लक गोष्टींचा समावेश केला नाही.
4. आजपर्यंत बंटीने चोरी करण्यापूर्वी कोणत्याही कारचे लॉक तोडले नाही. कार उघडण्यासाठी तो नेहमी कार मालकाच्या घरातून चोरलेली चावी वापरत असे.
5. बंटीबद्दल आणखी एक मनोरंजक गोष्ट होती. चोरी करण्यासाठी तो नेहमी कारमधून जात असे आणि जुनी गाडी जागेवरच सोडून तो घटनास्थळी सापडलेल्या नवीन कारमधून फरार व्हायचा.