सिमला : उष्णकटिबंधीय (ट्रॉपिकल) हवामान असलेल्या कर्नाटकात सफरचंदे पिकविण्याचे प्रयोग काही हुन्नरी शेतकरी करीत असून यात त्यांना व्यापारी पातळीवर यश आले तर देशाच्या फलोद्यान क्षेत्रात एक प्रकारे क्रांती होऊन सफरचंदांच्या बाबतीत हिमामल प्रदेश आणि काश्मीरची सध्या असलेली मक्तेदारी संपुष्टात येऊ शकेल.हिमाचल प्रदेशातील मंडी येथील एक कृषी वैज्ञानिक चिरंजीत परमार यांनी सहसा समशीतोष्ण हवामानातील सफरचंद हे फळ उष्णकटिबंधीय वातावरणात पिकविण्याचे तंत्र विकसित केले असून कर्नाटकात सध्या सुरु असलेल्या सफरचंदाच्या बागा फुलविण्यासाठीही तेच शेतकऱ्यांना तंत्रशास्त्रीय ज्ञान देत आहेत. परमार हे पूर्वी सोलन येथील वाय.एस. परमार फलोद्यान व वनीकरण विद्यापीठात संशोधक-अध्यापक होते. इंडोनेशियात उष्णकटिबंधीय हवामानात पिकविल्या जाणाऱ्या सफरचंदांच्या बागांचा अभ्यास केल्यानंतर ते आता तोच प्रयोग भारतात करीत आहेत.परमार यांनी सांगितले की, थंडीचा हंगाम जवळजवळ नसलेल्या केरळ व तमिळनाडू यासारख्या उष्णकटिबंधीय वातावरणाच्या राज्यांमध्येही सफरचंदाचे पिक घेणे शक्य असून हे प्रयोग यशस्वी झाले तर भारतात सफरचंद लागवडीत क्रांती होऊ शकेल.परमार यांनी दिलेल्या माहितीनुसार कर्नाटकातील सफरचंद लागवड सध्या प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आली असून ही व्यापारीदृष्ट्या कितपत यशस्वी होते याचा अनुमान काढायला आणखी दोन-तीन वर्षे जावी लागतील.कर्नाटकच्या मुख्यत: कुर्ग, तुमकुर, चिकमगळूर आणि शिमोगा जिल्ह्यांमध्ये सफरचंदाच्या सहा हजारांहून अधिक झाडांची लागवड करण्यात आली आहे. पहिली रोपे सन २०११ मध्ये लावली गेली. कुल्लु फलोद्यान विद्यापीठाच्या बजौरा रोपवाटिकेतून ही रोपे पुरविली गेली. (वृत्तसंस्था)
कर्नाटकातही पिकताहेत सफरचंदे!
By admin | Published: February 10, 2015 3:54 AM