Apple Hacking: मंगळवारी(दि.31) अचानक देशातील अनेक नेत्यांच्या iPhone वर अलर्ट मेसेज आला. यानंतर विरोधी पक्षनेत्यांनी सरकारवर हॅकिंगचा आरोप केला. दरम्यान, केंद्र सरकारने आयफोन हॅकिंगचा विरोधकांचा दावा फेटाळून लावला आहे. केंद्रीय आयटी मंत्री अश्विन वैष्णव यांनी या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
केंद्रीय आयटी मंत्री म्हणतात...या आरोपांवर स्पष्टीकरण देताना अश्विन वैष्णव म्हणाले की, आमच्या काही सहकाऱ्यांनी अॅपल अलर्टबाबत माहिती दिली आहे. आम्ही या प्रकरणाच्या तळापर्यंत जाऊ. आमचे काही टीकाकार नेहमीच खोटे आरोप करतात. त्यांना देशाची प्रगती पाहवत नाही. अॅपलने फक्त भारतात नाही, तर 150 देशांमध्ये अलर्ट जारी केला आहे. अॅपल कंपनीने याबाबत स्पष्टीकरणही दिले आहे.
प्रियांका गांधींचा उल्लेख वैष्णव पुढे म्हणाले, विरोधी पक्षांना ही सवयच आहे. कुठलाच मुद्दा सापडत नसेल, तर हेरगिरीचे आरोप करतात. काही वर्षांपूर्वीही त्यांनी हा आरोप केला होता, त्या प्रकरणाचा तपास सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली झाला, पण काहीही निष्पन्न झाले नाही. प्रियंका गांधी यांनीही आपल्या दोन मुलांचे फोन हॅक झाल्याचा दावा केला होता, मात्र काहीही निष्पन्न झाले नाही.
मालवीय यांची टीकाअॅपलच्या स्पष्टीकरणानंतर भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय म्हणाले की, राहुल गांधींनी स्वतःची खिल्ली उडवल्यानंतर काही मिनिटांतच अॅपलने निवेदन जारी करुन स्पष्टीकरण दिले. मागच्या वेळीही राहुल गांधींनी त्यांचा फोन चाचणीसाठी जमा केला नव्हता. फालतू आरोप करून त्यांनी देशाचा वेळ वाया घालवाला. अॅपलने केवळ भारतातच नाही तर जगभरातील 150 देशांमध्ये अलर्ट पाठवला आहे. यावर कंपनीही स्पष्टपणे काही सांगू शकली नाही. त्यामुळे यात सरकारचा हात आहे, असे विरोधकांनी मानणे पूर्णपणे मूर्खपणाचे आहे.
या नेत्यांचा सरकारवर आरोपकाँग्रेस नेते राहुल गांधी, शशी थरूर, शिवसेना (यूबीटी) खासदार प्रियांका चतुर्वेदी, तृणमूल काँग्रेस (टीएमसी) महुआ मोइत्रा आणि आम आदमी पार्टी (आप) राघव चड्ढा यांच्यासह अनेक विरोधी नेत्यांनी मंगळवारी त्यांच्या आयफोनवर अलर्ट आल्याचे सांगितले. तसेच, केंद्र सरकारवर हेरगिरीचा आरोप केला.
अलर्टमध्ये काय आहे?अॅपलकडून आलेल्या अलर्टमध्ये म्हटले आहे की, "स्टेट स्पँसर्ड हल्लेखोर आयफोनमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. हल्लेखोर तुमची वैयक्तिक माहिती मिळवू शकतात."
अॅपलने काय म्हटले?हॅकिंगच्या दाव्यांवर अॅपलने सांगितले की, "हा अलर्ट कशामुळे आला, याबद्दल आम्ही माहिती देऊ शकत नाहीत. यामुळे हॅकर्स अलर्ट होऊ शकतात. पण, आम्ही या अलर्टसाठी एखाद्या विशिष्ट हल्लेखोराला/हॅकरचे नाव घेऊ इच्छित नाही. हल्लेखोर आर्थिक आणि तांत्रिकदृष्ट्या शक्तिशाली आहेत आणि हल्ले सहसा पूर्णपणे शोधले जात नाहीत," असे कंपनीने म्हटले आहे.