खुनात जामीन अर्ज फेटाळला
By admin | Published: February 14, 2015 11:52 PM
आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला
आरोपीचा जामीन अर्ज फेटाळलानरेंद्र पिंपळीकर खून प्रकरण नागपूर : बेसा रेवतीनगर येथील नरेंद्र पिंपळीकर याच्या खूनप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. सलमान आझमी यांच्या न्यायालयाने एका आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला. वीरेंद्र ऊर्फ वीरू भोलेनाथ फटिंग (३०) असे आरोपीचे नाव असून, तो मानेवाडा रोड लवकुशनगर येथील रहिवासी आहे. वीरेंद्र हा कुख्यात गुन्हेगार अनिल ऊर्फ अण्णा राऊत याचा ड्रायव्हर आहे. २५ जानेवारी रोजी नरेंद्र पिंपळीकर हा आपल्या घरी स्वत:चा वाढदिवस साजरा करीत असताना रात्री ८.४५ वाजताच्या सुमारास वीरेंद्रसह पाच जणांनी एमएच-३१-ईए-५१५१ क्रमांकाच्या टोयोटा फॉर्च्युनरमध्ये त्याला बसवून अपहरण केले होते. त्याला पिपळा मार्गाने नेऊन आरोपींपैकी सूरज ऊर्फ कांची प्रकाश गायगवळी याने त्याच्या छातीवर शस्त्राने वार केला होता. त्यानंतर घाबरून त्याला मेडिकल कॉलेज इस्पितळात नेऊन स्ट्रेचरवर ठेवून सर्व आरोपी पसार झाले होते. वीरेंद्र फटिंग याचा गाडीमालक अनिल राऊत याने मांगीलाल सुतार याच्याकडून स्वस्त दरात बाभूळखेड्याच्या इंद्रप्रस्थनगर येथील २५६८ चौरस फुटाचा १३० क्रमांकाचा भूखंड घटनेच्या दीड महिन्यापूर्वी नऊ लाख रुपयात विकत घेतला होता. मांगीलाल याने सक्करदऱ्याच्या उपनिबंधक कार्यालयातून आममुख्त्यारपत्र तयार करून दिले होते. मांगीलालने दलालीचे ५० हजार रुपये संजय गवईला दिले होते. गवई याने या दलालीतील १० हजार रुपये फटिंगला आणि १३ हजार रुपये गोलूला दिले होते. वस्तुत: हा भूखंड मोरेश्वर खातखेडे यांचा होता. बनावट दस्तऐवजावर तो मांगीलाल आणि नरेंद्र पिंपळीकर यांनी विजय नरडकर आणि अनिल राऊत यांना विकला होता. ही बनबाबनवी लक्षात आल्यानंतर मांगीलाल याचा आरोपींनी बराच शोध घेऊन त्याला पकडले होते आणि अनिल राऊतच्या कार्यालयात हजर केले होते. घटनेच्या दिवशी त्यानेच आरोपींना पिंपळीकर याच्या घरी नेले होते. मांगीलाल हा या गुन्ह्यात फरार आहे. वीरेंद्र फटिंगने जामीन अर्ज दाखल करताच सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील रवींद्र भोयर यांनी आपल्या युक्तिवादात जामिनास जोरदार विरोध केला. आरोपी जामिनावर सुटल्यास साक्षीदारांवर दबाव आणून त्यांना फितवेल आणि तपासात अडथळा निर्माण होईल, असे सरकारचे म्हणणे ग्राह्य धरून न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला.