ऑनलाइन लोकमतइस्लामाबाद, दि. 22 - हेरगिरी, विघातक कारवाया आणि दहशतवादी कृत्ये केल्याच्या आरोपावरून पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावलेले भारताचे माजी नौदल अधिकारी कमांडर कुलभूषण सुधीर जाधव यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांच्याकडे दयेचा अर्ज केला आहे.पाकिस्तानच्या लष्करी जनसंपर्क विभागाचे प्रमुख मेजर जनरल आसिफ गफूर यांनी गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात ही माहिती देताना सांगितले की, लष्करी अपिली न्यायालयाकडे केलेले अपील फेटाळल्यानंतर जाधव यांनी लष्करप्रमुखांकडे हा दयेचा अर्ज केला आहे. यानंतर कायद्यानुसार त्यांना पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांकडे दयेचा अर्ज करण्याचा पर्याय उपलब्ध आहे.जाधव यांनी या दयेच्या अर्जात आपण हेरगिरी व विघातक आणि दहतवादी कारवाया केल्याची कबुली देऊन त्यामुळे मोठया प्रमाणावर झालेल्या जीवितवित्तहानीबद्दल पश्चात्ताप व्यक्त करत लष्करप्रमुखांना दयाबुद्धीने आपले प्राण वाचविण्याची विनंती केली आहे, असा दावा या निवेदनात करण्यात आला.
कुलभूषण जाधव यांनी केला दयेसाठी अर्ज
By admin | Published: June 22, 2017 9:44 PM
न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावलेले भारताचे माजी नौदल अधिकारी कमांडर कुलभूषण सुधीर जाधव यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांच्याकडे दयेचा अर्ज केला
भारत पाकिस्तानमध्ये काय उपद्व्याप करीत आहे हे जगाला कळावे, यासाठी जाधव यांनी लिहून दिलेला दुसरा कबुलीजबाबही आपण मुद्दाम प्रसिद्ध केला आहे. जनरल गफूर यांनी तो कबुलीजबाबही फेसबूरवर टाकला. भारताने केलेल्या याचिकेवर दि हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जाधव यांच्या फाशीला अंतरिम स्थगिती दिली आहे. पाकिस्ताननेही त्या न्यायालयाचा अंतिम निकाल होईपर्यंत व जाधव यांनी कायद्यानुसार उपलब्ध असलेले सर्व मार्ग अनुसरल्याशिवाय त्यांना फाशी देण्यात येणार नाही, असे आश्वासन दिले आहे.