एस.पी. सिन्हा , पाटणा बिहारमधील नितीशकुमार सरकारने देशीपाठोपाठ विदेशी दारूवरही बंदीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेत मंगळवारपासून देशी आणि विदेशी मद्य विक्रीवर राज्यात संपूर्ण बंदी घातली आहे.राज्यातील हॉटेल्स आणि बारमध्येसुद्धा दारू पुरविली जाणार नाही तथा यासाठी परवानेही दिले जाणार नाहीत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सांगितले की, राज्यात दारूबंदीसाठी वातावरणाची आपण वाट पाहत होतो. गेल्या चार दिवसांत देशी दारूबंदीला मिळालेला उस्फूर्त प्रतिसाद पाहून हा निर्णय घेण्यात आला.संपूर्ण दारूबंदी असलेले बिहार हे गुजरात,नागालँड आणि मिझोरमनंतर देशातील चौथे राज्य झाले आहे. राज्यात १ एप्रिल रोजी देशी दारूवर बंदी घालण्यात आली. सरकारी दुकानांवर विदेशी दारूची विक्री सुरू होती. आता तीही दुकानेही बंद करण्यात येतील. हॉटेल, रेस्टॉरेंट अथवा क्लबला दारू विक्रीचा परवाना दिला जाणार नाही. लष्कराच्या कॅन्टिनमध्ये मात्र पूर्वीप्रमाणेच दारू मिळत राहील,असे नितीशकुमार यांनी जाहीर केले. दारूबंदीसाठी त्यांनी महिलांचे आभार मानण्यासोबतच त्यांच्या प्रयत्नांची प्रशंसा केली. दारुबंदीसाठी महिला मोठ्या संख्येत समोर आल्या होत्या.ज्या ठिकाणी सरकारच्या बिव्हरेजेस कॉर्पोरेशनद्वारे दारूची दुकाने उघडण्यात येत होती, त्यालाही प्रचंड विरोध झाला. भारतीय जनता पार्टीने दारूबंदीच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
बिहारमध्ये संपूर्ण दारूबंदी लागू
By admin | Published: April 06, 2016 4:31 AM