नवी दिल्ली - महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या तिढ्यातून भाजपा आणि शिवसेना यांच्यातील तणाव वाढला. अखेर शिवसेनेने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे एनडीए अर्थात नॅशनल डेमोक्रेटिक आघाडीत सर्वकाही ठीक आहे असं चित्र दिसत नाही. शिवसेनेपाठोपाठ इतरही घटक पक्ष समोर येऊन बोलू लागले आहेत. एनडीएतून बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदाच गेल्या ३० वर्षात शिवसेना या बैठकीत सहभागी झाली नाही.
या बैठकीनंतर लोक जनशक्ती पार्टीचे नवनियुक्त प्रमुख चिराग पासवान यांनी एनडीएमधील घटकपक्षांना एकत्र ठेवण्यासाठी एका संयोजकाची गरज असल्याचं सांगितले. घटकपक्षांमध्ये एकवाक्यता असली पाहिजे, त्यांच्यात संवाद असला पाहिजे यासाठी हा संयोजक नियुक्त करणं गरजेचं आहे असं त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, पहिल्यांदा तेलुगू देशम पार्टी(TDP) ने एनडीएची साथ सोडली. त्यानंतर उपेंद्र कुशवाह यांच्या राष्ट्रीय लोकसमता पार्टीही वेगळी झाली. २०१८ च्या अखेर लोकसभा निवडणुकीतील जागा वाटपावर नाराज होत त्यांनी एनडीएपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. मार्च २०१८ मध्ये आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीवरुन टीडीपीने एनडीएपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला.
सध्या बिहारमध्ये भलेही भाजपा आणि नितीशकुमार यांची जेडीयू पार्टीसोबत असेल पण या दोघांमधीलही वाद अनेकदा समोर आला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर जेडीयूला मोदी यांच्या मंत्रिमंडळात एक कॅबिनेट पद देण्यावरुन नितीशकुमार नाराज झाले. त्यांनी मंत्रिपद घेण्यास नकार दिला पण एनडीएसोबत राहिले.
वाजपेयी यांच्या काळात संयोजक होतेमाजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कारकिर्दीत एनडीएच्या घटकपक्षांमध्ये सुसंवाद ठेवण्यासाठी संयोजक नियुक्त होता. शरद यादव आणि जॉर्जं फर्नांडिससारखे नेते अनेक वर्ष यापदावर होते. २०१३ मध्ये जेडीयू आघाडीपासून वेगळे होऊन शरद यादव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर एनडीएमधील संयोजक पद रिक्त आहे.
२०१३ नंतर बदलली एनडीएची स्थिती२०१४ मध्ये नरेंद्र मोदी जेव्हा पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा घटकपक्षाचे नेते सांगतात की, मोदी संसदेच्या प्रत्येक सत्रात एनडीएची बैठक बोलवतात आणि आघाडीबाबत काही तक्रारी समस्या सोडविण्याचे काम अमित शहा करतात.