नवी दिल्ली: भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार उद्या(18 फेब्रुवारी 2025) रोजी निवृत्त होत आहेत. दरम्यान, नवीन निवडणूक आयुक्तांच्या निवडीसाठी आज(17 फेब्रुवारी) निवड समितीची बैठक झाली. पीएमओमध्ये झालेल्या या बैठकीला पंतप्रधान मोदी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते. मीडिया रिपोर्टनुसार, या बैठकीत राहुल गांधींनी ही नियुक्ती पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयात सीईसी नियुक्तीबाबत सुनावणी सुरू आहे. अशा स्थितीत नवीन नियुक्तीचा निर्णय काही दिवस पुढे ढकलण्यात यावा. यात अहंकार असण्यासारखे काही नाही. हीच लोकशाही आणि प्रजासत्ताकाची मागणी आहे, अशी मागणी राहुल गांधींनी केली आहे. समितीची रचना काय असावी, यावर 19 फेब्रुवारीला सुनावणी होईल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. हे पाहता आजची बैठक पुढे ढकलायला हवी होती, असे काँग्रेसचे मत आहे.
काँग्रेस खासदार अभिषेक मनु सिंघवी यांनीदेखील निवड पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, निवडणूक आयोग ही घटनात्मक संस्था आहे. निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीत पंतप्रधान/गृहमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यासोबतच, सरन्यायाधीशांचा सहभाग असावा. 2 मार्च 2023 रोजी सर्वोच्च न्यायालयानेही म्हटले होते की, सीईसी आणि निवडणूक आयोगाच्या निवडीमध्ये सीजेआय यांचा सहभाग असणे आवश्यक आहे. सीईसीची निवड केवळ कार्यकारिणीने करू नये. त्यामुळे आजची ही बैठक काही दिवस पुढे ढकलावी, अशी आमची मागणी आहे.