पाटणा : पाटण्याहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाने उड्डाण घेताच इंजिनमध्ये आग भडकली. स्पाईस जेटच्या एसजी-७२५ या विमानात आग लागताच वैमानिकाने सुरक्षित लँडिंग केले व १८५ प्रवासी बचावले. मात्र, विमानाच्या इंजिनमधून धूर निघत असून, आग लागल्याची माहिती मिळताच प्रवासी काही काळ भयभीत झाले होते. याघटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार आहे. मोनिका खन्ना या पायलट बनून या विमानाचं सारथ्य करत होत्या. मोनिकाने अतिशय कुशलतेनं विमानाचं लँडिंग करुन १८५ प्रवाशांचा जीव वाचवला.
पाटणा विमानतळ प्राधिकरणाने सांगितले की, सर्व प्रवासी सुरक्षित असून, त्यातील कोणीही जखमी झालेले नाही. आग लागल्याची माहिती मिळताच अत्यंत सावधतेने विमानाचे लँडिंग करण्यात आले. आग का लागली, याची चौकशी केली जात आहे. तथापि, विमानाला एखाद्या पक्ष्याची टक्कर झाली असावी, याचा त्यांनी इन्कार केला नाही. फ्लाईट एसजी 723 ची पालयट इन कमांड कॅप्टन मोनिका यांना आग लागल्याची माहिती मिळताच संबंधित इंजिन बंद केले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. स्पाईस जेटकडूनही मोनिका यांचा अभिनंदन करण्यात आलं आहे. कारण, पाटणा विमानतळावर लँडिंग एवढं सोपं नव्हतं. मोनिका यांच्यासह त्यांचे पायलट सहकारी बलप्रीत सिंह यांनी या दुर्घटनेवेळी सावधानता आणि चुतराई दाखवली, असे स्पाईस जेटने म्हटले आहे.
पाटण्यातील फुलवारीशरीफ भागावरून विमान जात असताना स्थानिक लोकांनी त्यातून धूर निघताना पाहिला. लोकांनी तातडीने जिल्हा प्रशासन व विमानतळाला याची माहिती कळवली. यानंतर विमान सुरक्षितरीत्या पाटणा विमानतळावर उतरविण्यात आले. विमानातील प्रवाशांना अन्य विमानाने दिल्लीला पाठविले. विमानातील आगीवर तातडीने नियंत्रण मिळविण्यात आले. विमानात आगीमुळे जास्त नुकसान झाले नाही.
प्रवासी भयभीत
एका महिला प्रवाशाने सांगितले की, विमानात आग लागल्याचे कळताच सर्व प्रवासी भयभीत झाले होते. परंतु, विमानाच्या क्रू मेंबरनी स्थिती चांगल्या पद्धतीने हाताळली. विमानाने उड्डाण घेताच १०-१५ मिनिटांतच लक्षात आले की, काहीतरी गडबड आहे. विमानात फार आवाज येत होता. विमान कधी डावीकडे, तर कधी उजवीकडे झुकत होते.
२००० मधील भीषण अपघाताची आठवण
१७ जुलै २००० रोजी पाटण्यात भीषण विमान अपघात झाला होता. कोलकाताहून दिल्लीकडे निघालेले विमान पाटण्याच्या गर्दनीबागमध्ये कोसळले होते. त्यात ६ स्थानिक नागरिकांसह ६० पेक्षा अधिक लोक ठार झाले होते. त्या भीषण अपघाताची रविवारी आठवण अनेकांना झाली.