लोकमत न्यूज नेटवर्क, तवांग/नवी दिल्ली : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी अरुणाचल प्रदेशातील तवांगमध्ये शस्त्रपूजन केले आणि चीनच्या सीमेजवळील सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या प्रदेशात लष्कराच्या जवानांसोबत दसरा साजरा केला. यावेळी त्यांनी लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांच्यासमवेत अरुणाचल प्रदेशातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारताच्या लष्करी सज्जतेचा आढावा घेतला आणि अतुलनीय धैर्याने सीमेचे रक्षण केल्याबद्दल सैन्याचे कौतुक केले.
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली संरक्षण क्षेत्रात ‘आत्मनिर्भरते’च्या दिशेने मोठे पाऊल टाकण्यात आले आहे. पूर्वी आम्ही आमच्या सैन्यात सुधारणा करण्यासाठी आयातीवर अवलंबून राहायचो; पण आज अनेक प्रमुख शस्त्रे देशातच तयार केली जात आहेत. परदेशी कंपन्यांना त्यांचे तंत्रज्ञान सामायिक करण्यासाठी आणि भारतातील उपकरणांचे उत्पादन देशांतर्गत उद्योगांना करण्यास प्रोत्साहन दिले जात आहे,’ असे ते म्हणाले.
संरक्षण साहित्यांची परदेशात निर्यात
२०१४ मध्ये देशातील संरक्षण सामग्रीची निर्यात १,००० कोटी रुपये होते; परंतु आज आम्ही हजारो कोटी रुपयांच्या संरक्षण उपकरणांची निर्यात करत आहोत, असेही सिंह यांनी यावेळी सांगितले.