नितीन अग्रवालनवी दिल्ली : मॉडर्नाची कोविड-१९ वरील लस देशात मर्यादित आणि तातडीच्या वापरासाठी आयात करण्याची परवानगी मुंबईस्थित सिप्ला या औषध कंपनीला देशाच्या औषध नियंत्रकांनी (डीसीजीआय) दिली आहे, असे निती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के. पॉल यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. ‘मॉडर्नाचा अर्ज तिची भारतीय भागीदार सिप्लाकडून प्राप्त झाल्यानंतर मॉडर्नाच्या कोविड-१९ लसीला तातडीच्या मर्यादित वापरासाठी मंजुरी औषध नियंत्रकांनी दिली आहे. ही लस नजिकच्या भविष्यात आयात केली जाण्याची स्पष्ट शक्यता आहे, असे ते म्हणाले. कोविशिल्ड, कोव्हॅक्सीन, स्पुटनिक आणि मॉडर्ना या अधिकृत परवाना असलेल्या लसी असल्याचे पॉल म्हणाले.
डॉ. पॉल म्हणाले की, मॉडर्नाला सात महिन्यांपर्यंत उणे १५ ते उणे २५ अंश तापमानात ठेवले जाऊ शकते. ३० दिवसांपर्यंत तिला २ ते ८ अंश तापमानावर ठेवले जाऊ शकते. इतर लसीप्रमाणे २८ दिवसांनंतर तिची दुसरी मात्रा देता येते. लवकरच यजरची लसही उपलब्ध होऊ शकते. सरकारने कंपनीला सांगितले असून आता कंपनीकडून उत्तर यायचे आहे.”
लसीमुळे नपुंसकता नाहीलसीमुळे नपुंसकता येते या चर्चांवर पॉल म्हणाले, तो पूर्णपणे भ्रम आणि गैरसमज निर्माण करणारा भाग आहे. चारही लसींच्या जनावरे आणि मानवावरील चाचण्यांमुळे हे स्पष्ट आहे की, त्यांचा नपुंसकतेशी काहीही संबंध नाही. आतापर्यंत भारतात उपलब्ध असलेल्या चार लसी स्तनदा महिलांसाठीही पूर्णपणे सुरक्षित आहेत.