कोची : आजारी व्यक्तीचे शुक्राणू घेण्याची आणि ते संरक्षित करण्याची परवानगी देणारा महत्त्वपूर्ण निर्णय केरळ उच्च न्यायालयाने दिला आहे. एका महिलेने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आजारी पतीचे शुक्राणू संरक्षित करण्याची मागणी केली होती. या शुक्राणूंद्वारे गर्भधारणेच्या नव्या तंत्रांचा वापर करून या महिलेला अपत्य हवे आहे.
न्यायमूर्ती व्ही. जी. अरुण यांनी १६ ऑगस्ट रोजीच्या आदेशात पतीचे शुक्राणू घेण्यास आणि ते संरक्षित करण्यास मंजुरी दिली. पती गंभीर आजारी असल्याने ते शुक्राणू घेण्याविषयी लेखी परवानगी देण्याच्या स्थितीत नाहीत आणि काही बरेवाईट झाल्यास उशीर होईल, असा युक्तिवाद महिलेतर्फे न्यायालयात करण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्यातूनही महिलेला सूट दिली.