नवी दिल्ली - देशातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. दिल्लीतील निजामुद्दीन येथील तबलिगी जमातच्या धार्मिक कार्यक्रमात संक्रमित लोक सहभागी झाल्यानंतर कोरोना बाधितांचा आकडा झपाट्याने वाढत असल्याचे बोलले जात आहे. यापार्श्वभूमीवर सोमवारी देशाच्या वेगवेगळ्या भागांत जमातमधील लोकांना आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या जवळपास 25 हजार 500 लोकांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या संयुक्त सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी यासंदर्भात सोमवारी माहिती दिली. पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हरियाणातील पाच गावे सील करण्यात आली आहेत. तसेच अनेकांना आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. कारण या गावांमध्ये तबलिगी जमातचे सदस्य थांबले होते. याशिवाय आतापर्यंत तबलिगी जमातच्या एकूण 2 हजार 083 परदेशी सदस्यांपैकी 1 हजार 750 जणांना ब्लॅक लिस्ट करण्यात आले आहे.
ऑक्सिजन कमी पडू देऊ नका, राज्यांना निर्देश -
श्रीवास्तव म्हणाल्या केन्द्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र पाठवले आहे. यात कोरोनाग्रस्तांच्या उपचारात ऑक्सिजनची कमतरता पडणार नाही यावर लक्ष ठेवावे. तसेच सोशल डिस्टंसिंगचेही काटेकोरपणे पालन करा, असे निर्देश देण्यात आले आहे. कोरोना व्हायरसच्या दृष्टीने ऑक्सिजनचा समावेश जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) आवश्यक वस्तूंच्या यादीमध्ये करण्यात आला आहे.
या मरकजमध्ये सहभागी झालेल्या जवळपास1600 जणांना निजामुद्दीन येथेच क्वारंटाइन करण्यात आले आहे. यांपैकी ज्यांच्यात कोरोनाची लक्षणे जावत आहेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.