संजय शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये प्रथमच विधानसभा निवडणूक एप्रिल महिन्यात होऊ शकतात. निवडणुकीच्या तयारीसाठी जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या संख्येने सुरक्षा दले पाठवली जात आहेत. निवडणूक आयोगानेही याबाबत राजकीय पक्षांशी चर्चा सुरू केली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जम्मू-काश्मीरहून दिल्लीत परतल्यानंतर गृह मंत्रालय व निवडणूक आयोग तयारीला लागले आहेत. सीआरपीएफ जवान मोठ्या संख्येने जम्मू-काश्मीरमध्ये पाठवले जात आहेत. ते विधानसभा निवडणूक पूर्ण होईपर्यंत तेथे असतील. आयोगानेही १६ जानेवारी रोजी राजकीय पक्षांना चर्चेसाठी बोलावले आहे. सर्व काही सुरळीत झाले तर काश्मिरात बर्फ वितळताच एप्रिलमध्ये विधानसभा निवडणूक हाऊ शकते.
२०१८ पासून राष्ट्रपती राजवट
जम्मू-काश्मीरमध्ये २०१८ मध्ये सरकार बरखास्त करण्यात आले होते. तेव्हापासून तेथे राष्ट्रपती राजवट लागू आहे. जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका घेण्याची मागणी राजकीय पक्ष अनेक दिवसांपासून करीत आहेत.
परिस्थितीत झाला बदल
भाजपचे जम्मू-काश्मीर प्रभारी राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चूघ यांनी सांगितले की, राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा ३० जानेवारी रोजी काश्मीरमध्ये समारोप होणार आहे. राहुल गांधी खोऱ्यात सुरक्षित यात्रा काढू शकत आहेत, याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले पाहिजेत; अन्यथा काश्मीर खोऱ्यात आधी जी स्थिती होती, ती पाहता कोणीही यात्रा काढण्याचा विचारही करू शकत नव्हता.