नवी दिल्ली: काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांचा 'राष्ट्रपत्नी' असा उल्लेख केल्याने लोकसभेत मोठा गोंधळ उडाला आहे. चौधरी यांच्या या शब्दानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी काँग्रेसवर टीका केली असून, पक्षाध्यक्ष सोनिय गांधी यांनीही माफी मागण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या प्रकरणावर चौधरी यांनी आपली बाजू मांडली आहे.
'माझ्याकडून चूक झाली'लोकसभेच्या गोंधळानंतर मीडियाशी संवाद साधताना अधीर रंजन चौधरी म्हणाले की, ''मी भारताच्या राष्ट्रपतींचा अपमान करण्याचा विचारही कधी करू शकत नाही. माझ्याकडून चूक झाली. राष्ट्रपतींना याबाबत वाईट वाटले असेल तर मी त्यांना वैयक्तिकरित्या भेटेन आणि माफी मागेन,'' असे चौधरी म्हणाले.
'...तर फासावर लटकवा'ते पुढे म्हणाले की, "बोलण्याच्या ओघात माझ्याकडून चुकून राष्ट्रपतींचा राष्ट्रपत्नी असा उल्लेख झाला. एकदा चूक झाली तर मी आता काय करू? यावरुन मला फासावर लटकवायचे असेल तर लटकवा, मी शिक्षा भोगायला तयार आहे. पण याप्रकरणात आमच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना ओढू नका. त्यांचा यात काहीही संबंध नाही,'' अशी प्रतिक्रिया चौधरी यांनी दिली.