नवी दिल्ली- भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग महाभारतातील प्रसिद्ध लाक्षागृहाचा शोध लावणार आहे. उत्तर प्रदेशमधील बागपत जिल्ह्यातील बरनावा भागात लाक्षागृहाचा शोध घेण्यासाठी एएसआयकडून खोदकामही करण्यात येणार आहे. स्थानिक इतिहासतज्ज्ञ आणि पुरातत्त्ववाद्यांच्या अनेक वर्षांपासूनच्या या मागणीला भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागानं मंजुरी दिली आहे.महाभारतात पांडवांना जिवानिशी मारण्यासाठी कौरवांनी लाखेपासून हा महाल बनवला होता. ज्यात पांडवांना जिवंत जाळण्याची योजना होती. परंतु पांडवांना विदुरच्या माध्यमातून याची सूचना मिळाली आणि ते महालातील गुप्त मार्गानं बाहेर निघाले. या लाखेच्या महालाला लाक्षागृह म्हटलं जातं.टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, एएसआयचे निर्देशक जितेंद्र नाथ म्हणाले की, प्रस्तावाचा सखोल अभ्यास केल्यानंतर आम्ही एएसआयच्या दोन प्राधिकरणांना शोधकामासाठी परवाना दिला आहे. एएसआयच्या उत्खनन शाखा आणि दिल्लीतील लाल किल्लेस्थित पुरातत्त्व विज्ञान संस्थांचाही यात सहभाग आहे. पुढच्या महिन्यात खोदकामाला सुरुवात होणार आहे. दोन्ही संस्था संयुक्तरीत्या खोदकाम करून लाक्षागृहाचा थांगपत्ता लावणार आहेत.पुढच्या महिन्याच्या सुरुवातीला खोदकाम सुरू होईल आणि ते तीन महिने सुरू राहील. पुरातत्त्व विज्ञान संस्थेचे विद्यार्थीही यात सहभागी होतील. एएसआयला या खोदकामातून काही तरी हाती लागेल, अशी आशा आहे. या आधीही आजूबाजूच्या खोदकामात महत्त्वपूर्ण वस्तू सापडल्या आहेत. उत्खननामध्ये हडप्पा संस्कृतीच्या वेळीच्या वस्तूही सापडल्या होत्या. चंदायन आणि सनोलीजवळ हे खोदकाम करण्यात आलं होतं. सनोलीमध्ये उत्खननादरम्यान हडप्पा संस्कृतीच्या काळातील काही महत्त्वपूर्ण वस्तूही सापडल्या आहेत. 2005मध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सापळे आणि भांडी सापडली होती. तसेच 2014मध्ये चंदायन गावात एक तांब्याचं एक मुकूटही सापडला असून, तो रत्नजडित होता. पांडव लक्षागृहातील त्या गुप्त बोगद्यातून बाहेर पडले, तो शोधण्यात एएसआयला रुची आहे.
पांडवांचं लाक्षागृह शोधणार पुरातत्त्व विभाग, पुढच्या महिन्यात होणार खोदकामाला सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2017 8:47 PM