"भाजपचे नेते लाल किल्ला, ताजमहाल, कुतुब मीनारही तोडणार आहेत का?"; खरगेंचा भाजपला सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 08:33 AM2024-12-02T08:33:57+5:302024-12-02T08:37:34+5:30
दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी भाजपवर टीकास्त्र डागलं.
संभल येथील शाही जामा मशीद आणि अजमेर येथील शरीफ दर्गा मुद्दा तापला आहे. याच मुद्द्यावरून काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वावर निशाणा साधला. भाजप देशातील मशिदींचे सर्वेक्षण करून समाजात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप खरगे यांनी केला. असे करून भाजप सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भूमिकेलाच विरोध करत आहे, असेही ते म्हणाले.
दिल्लीतील रामलीला मैदानात दलित, अल्पसंख्याक, आदिवासी आणि ओबीसी यांच्या एका संघटनेच्या वतीने रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीत बोलताना मल्लिकार्जून खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र डागलं.
लाल किल्ला, ताजमहालही पाडणार का?
भाजपला लक्ष्य करताना मल्लिकार्जून खरगे म्हणाले म्हणाले, "भाजपचे नेते लाल किल्ला, ताजमहाल, कुतुब मीनार किंवा चार मीनार सारख्या वास्तूही पाडणार आहेत का? ज्या मुस्लिमांनी बांधल्या आहेत."
उत्तर प्रदेशातील संभलमध्ये मशिदीच्या सर्वेक्षणावरून हिंसा झाली. त्या पार्श्वभूमीवर खरगे यांनी हे विधान केले. संभलमधील शाही जामा मशिदीच्या ठिकाणी पूर्वी मंदिर होते, असा दावा करण्यात आला आहे. त्याच्या पाहणीसाठी सर्वेक्षण करण्यात येत आहे.
खरगेंची मोदींवर टीका
मल्लिकार्जून खरगे यांनी म्हटले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वसामान्य माणसांविरोधात आहेत. कारण ते लोकांचा तिरस्कार करतात. आमची लढाई त्या द्वेषाविरोधात आहे आणि त्यामुळे राजकीय शक्ती महत्त्वाची आहे."
"प्रत्येक ठिकाणी सर्वेक्षण केले जात आहे. मशिदींच्या खाली मंदिरं शोधली जात आहेत. तशी मागणी जोर धरत आहे. पण, २०२३ मध्ये आरएसएस नेते मोहन भागवत यांनी म्हटले होते की, आमचा उद्देश राम मंदिर निर्माण करणे हे होते आणि आम्हाला मशिदींच्या खाली मंदिर शोधायची नाहीत", असे म्हणत खरगेंनी भाजपवर निशाणा साधला.
खरगे म्हणाले, "आपण सगळे एक आहोत आणि तुम्हा सगळ्यांची हीच इच्छा आहे. नरेंद्र मोदी म्हणतात की, एक हैं तो सेफ है. पण, ते कुणालाही सुरक्षित जगू देत नाहीयेत. सत्य हेच आहे की, मोदीच फूट पाडत आहेत", अशी टीका खरगेंनी केली.