लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीला मिळालेल्या यशानंतर राहुल गांधी यांनी लोकसभेचं विरोधी पक्षनेते पद स्वीकारत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एनडीए सरकारविरोधात आघाडी उघडली आहे. दरम्यान, राहुल गांधी यांनी देशाच्या विविध भागात दौरे आरंभले असून, विविध ठिकाणी भेटी देत ते लोकांचे प्रश्न जाणून घेत आहेत. दरम्यान, राहुल गांधी यांनी नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर जात तिथे लोको पायलटशी संवाद साधला होता. मात्र राहुल गांधी यांनी लोको पायलटची घेतलेली भेट आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
राहुल गांधी यांनी लोको पायलटची घेतलेली भेट आणि त्यांच्याशी केलेल्या चर्चेचे फोटो समोर आल्यानंतर उत्तर रेल्वेने त्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. राहुल गांधी यांनी ज्या लोकांशी संवाद साधला. त्यांच्या कर्मचाऱ्यांपैकी नव्हते. कदाचित ते बाहेरील असावेत. राहुल गांधी यांच्यासोबत ७ ते ८ कॅमेरामनही होते. असा दावा उत्तर रेल्वेकडून करण्यात आला. त्यानंतर भाजपाने या मुद्द्यावरून काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे.
भाजपाने आरोप केला की, राहुल गांधी यांनी ज्या कथित लोको पायलटांशी चर्चा केल्याचा दावा केला आहे, ते लोको पायलट नव्हते. तर प्रोफेशनल ॲक्टर्स होते. त्यांना राहुल गांधी स्वत: भाडं देऊन घेऊन आले होते. मात्र भाजपाने केलेल्या या आरोपांवर सध्यातरी राहुल गांधी आणि कांग्रेसकडून काहीही प्रतिक्रिया आलेली नाही.
उत्तर रेल्वेचे मुख्य जनसंपर्कत अधिकारी दीपक कुमार यांनी सांगितले की, राहुल गांधी यांनी ज्या क्रू मेंबर्ससोबत चर्चा केली होती. ते त्यांच्या क्रू लॉबीमधील नव्हते. ते बाहेरून आलेले होते. राहुल गांधी हे दुपारी १२.४५ च्या सु्मारास रेल्वे स्टेशनमध्ये आले. त्यांनी क्रू लॉबी पाहिली. त्यांच्यासोबत ७-८ कॅमेरामन होते. त्यांनी लॉबीचा दौरा केला. तसेच आम्ही आपली लॉबी कशी बूक करतो, याबाबत विचारणा केली. क्रू लॉबीतून ते बाहेर आल्यानंतर तिथे सुमारे ७-८ क्रू होते. मात्र लोको पायलट आमच्या लॉबीमधील नव्हते. कदाचित त्यांना बाहेरून आणलं असावं, असं त्यांनी सांगितलं.