ऑनलाइन लोकमत
पिलिभीत, दि. 4- सरकारकडून नुकसान भरपाई मिळावी, यासाठी घरातील वृद्ध व्यक्तीला वाघाच्या हवाली करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार पिलिभीतमध्ये घडत असल्याचं समोर आलं आहे. वाघाच्या हल्ल्यात घरातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यास सरकारकडून लाखो रुपये नुकसान भरपाई मिळत असल्याने हा प्रकार गावातील लोक करत असतील, असा संशय वनविभागाच्या अधिकाऱ्याने व्यक्त केला आहे. द टाइम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली आहे.
फेब्रुवारी २०१६ पासून फक्त माला या जंगलात वृद्ध व्यक्तीवर वाघाने हल्ला केल्याच्या सात घटना घडल्या आहेत. वाइल्ड क्राईम कंट्रोल ब्युरोच्या केंद्रीय सरकारी एजन्सीचे कलीम अतहर यांनी नुकसान भरपाई मिळविण्यासाठी वृद्धांना वाघाच्या हवाली केलं जातं, याबाबतचा संशय व्यक्त केला आहे. वाघाच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू झाला तर सरकार त्या घरातील व्यक्तींना लाखो रुपये नुकसान भरपाईच्या नावाखाली देत आहे. याचा गैरफायदा काही लोकांकडून घेण्यात येत असल्याचा संशय अधिकाऱ्याने व्यक्त केला. वाघाच्या हल्ल्यात मृत्यु झालेल्या लोकांच्या परिसरात जावून कलीम अतहर यांनी चौकशी केली होती. तेथे असलेल्या पीडित व्यक्तीची भेट घेवून नागरिकांशी संवाद साधल्यानंतर त्यांना हा संशय आला असून त्यांनी तसं अहवालात नमूद केलं आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, या संपूर्ण प्रक्रियेमध्ये कुटुंबातील वृद्ध व्यक्ती साथ देतात. वृद्धापकाळामुळे ते जंगलातून कुटुंबियांसाठी काही आणू शकत नाही त्यामुळेच वाघाच्या हवाली जावून घरची गरिबी दूर करण्याचा एक मार्ग म्हणून ते याकडे बघतात. असं तेथील जर्नेल सिंग या साठ वर्षीय शेतकऱ्याने सांगितलं आहे.
१ जुलै रोजी ५५ वर्षीय महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर वनविभागाचे अधिकारी व्ही. के. सिंह यांनी या प्रकरणाचा तपास केला पण त्यांना तपासातून खऱ्या गोष्टी समोर आल्या, असं वाटलं नाही. या प्रकरणात महिलेचा मृतदेह जंगलापासून १.५ किलोमीटर दूर होता त्यामुळे सिंह यांनी त्या महिलेच्या घरातील व्यक्तीचा नुकसान भरपाईचा दावा फेटाळून लावला होता