नवी दिल्ली : प्रख्यात संशोधक चार्ल्स डार्विन यांची ‘थिअरी ऑफ इव्होल्युशन’ आणि अल्बर्ट आइनस्टाइन यांची ‘थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी’ चुकीची आहे, हे सिद्ध करण्यासाठी आम्ही इथे बसलेलो नाही. तसे काही असेल तर तुम्ही स्वत:ची थिअरी तयार करा, अशा शब्दात शुक्रवारी सुप्रीम कोर्टाने एका याचिकाकर्त्याचे कान टोचले.
याचिकाकर्ते राजकुमार सुनावणीसाठी कोर्टात भगवे कपडे परिधान करून आले होते. त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले होते.
तुम्हाल वाटतेय तर तुम्ही सिद्ध करा- सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांच्या पीठाने स्पष्ट केले की, एखाद्या वैज्ञानिक सिद्धांताला खोडून काढण्यासाठी घटनेच्या ३२ व्या कलमानुसार कोणत्याही प्रकारची रिट याचिका करता येत नाही. - कोर्टाने स्पष्ट केले की, डार्विन आणि आइनस्टाइन यांनी मांडलेले वैज्ञानिक सिद्धांत कसे चुकीचे आहेत, हे याचिकाकर्त्याला दाखवून देण्यासाठी व्यासपीठ हवे आहे. असे वाटत असेल तर याचा जरूर प्रचार करू शकता.
याचिकेत मागणी काय? याचिकाकर्त्यांनी कोर्टात युक्तिवाद केला की, शाळा आणि कॉलेज जीवनात आपण चार्ल्स डार्विन यांनी मांडलेली ‘थिअरी ऑफ इव्होल्युशन’ आणि अल्बर्ट आइनस्टाइन यांच्या ‘थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी’चा अभ्यास केला. असे लक्षात आले की हे सिद्धांत चुकीचे आहेत. हे शिकवल्याने आपल्या मूलभूत अधिकारांवर गदा आली.
अधिकारांचा भंग नाही : कोर्टयावर कोर्ट म्हणाले की, तुम्ही म्हणत आहात की याचा अभ्यास तुम्ही शाळा आणि कॉलेजात केला. तुम्ही विज्ञानाचे विद्यार्थी होता. आता सांगत आहात की हे सिद्धांत चुकीचे आहेत. तुम्ही काय मानता याच्याशी आमचे घेणे-देणे नाही. यामुळे घटनेच्या ३२ व्या कलमानुसार आपल्याला मिळालेल्या कोणत्याही मूलभूत अधिकारांचे हनन होत नाही.