नवी दिल्ली - भारतीय स्टेट बँकेकडून ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. एसबीआयकडून जुन्या एटीएम डेबिट कार्डसंदर्भात महत्त्वाचे पाऊल उचलण्यात येत आहे. एसबीआयचे जुने मॅग्नेटिक डेबिट कार्ड लवकरच बंद होणार आहेत. एसबीआयने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याबाबत माहिती दिली असून 2018 संपण्यापूर्वी डेबिट कार्ड बदलून घेण्याचे आवाहन ग्राहकांना करण्यात आले आहे.
देशातील मोठी अन् महत्वाची बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांच्या सुरक्षेसाठी डेबिट कार्ड बदलण्याची सूचना केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सुचनेनुसार हा बदल करण्यात येत असल्याचेही आरबीआयने स्पष्ट केले आहे. एसबीआयकडून कनवर्जन प्रोसेस करण्यात येत असून यासाठी ग्राहकाला एक रुपयाही द्यावा लागणार नाही. तसेच ही प्रकिया पूर्णपणे सुरक्षित असल्याचेही एसबीआयने म्हटले आहे. ज्या ग्राहकांकडे मॅग्नेटिक डेबिट कार्ड आहे, त्या ग्राहकांना ईएमव्ही चीप डेबिट कार्डद्वारे 31 डिसेंबर पर्यंत आपले डेबिट कार्ड बदलावे लागणार आहे. जर, ग्राहकाने 31 डिसेंबरपर्यंत तुमचे डेबिट कार्ड न बदलल्यास, त्यानंतर जुन्या डेबिट कार्डने एकही व्यवहार करता येणार नसल्याचेही एसबीआयकडून सांगण्यात आले आहे.
31 डिसेंबरनंतर एटीएम बंद
एसबीआयच्या माहितीनुसार 31 डिसेंबरनंतर कुठल्याही बँक किंवा एटीएम मशिनमध्ये ग्राहकांचे जुने डेबिट कार्ड कार्यरत राहणर नाही. दरम्यान, गेल्या काही महिन्यात एसबीआयमध्ये 6 सहयोगी बँकांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे एसबीआय ग्राहकांची संख्या 32 कोटींपर्यंत पोहोचली आहे. तर कोट्यवधी लोकांनी आपले जुने डेबिट कार्ड देऊन, नवीन डेबिट कार्डसाठी अर्ज केला आहे.