Arvind Kejriwal on Mohan Bhagwat : आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना काही सवाल केले. भाजपाचे सध्याचे राजकारण, जेपी नड्डांचे विधान, भाजपामधील निवृत्तीच्या वयाचा नियम आदी मुद्द्यांवर केजरीवालांनी बोट ठेवले. (AAP leader Arvind Kejriwal asked Rashtriya Swayamsevak Sangh chief Mohan Bhagwat five questions about Prime Minister Narendra Modi and BJP)
अरविंद केजरीवाल सभेत बोलताना म्हणाले, "राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणतो आम्ही राष्ट्रवादी आहोत, आम्ही देशभक्त आहोत. मी आज पूर्ण आदर ठेवून आरएसएसचे प्रमुख मोहन भागवतजी यांना पाच प्रश्न विचारून इच्छितो. मला तुमचा पाठिंबा अपेक्षित आहे. चुकीचा प्रश्न विचारला तर मला सांगा. बरोबर प्रश्न विचारला तर हात वर करा", असे अरविंद केजरीवाल उपस्थितांना म्हणाले.
केजरीवालांचा मोहन भागवतांसाठी पहिला प्रश्न काय?
"मोहन भागवतांना माझा पहिला प्रश्न आहे की, ज्या प्रकारे मोदीजी देशभरात आमिष देऊन किंवा ईडी-सीबीआयची धमकी देऊन घाबरवतात आणि दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांना फोडतात; पक्ष फोडत आहेत. सरकारे पाडत आहेत. हे देशासाठी योग्य आहे का? हे भारतीय लोकशाहीसाठी हे घातक आहे, असे तुम्हाला वाटत नाही का?", असा सवाल केजरीवाल यांनी सरसंघचालकांना केला.
"देशभरातील सर्वात भ्रष्ट नेत्यांना मोदीजींनी आपल्या पक्षात सामील करून घेतले. ज्या नेत्यांना काही दिवस आधी मोदीजी सर्वात भ्रष्टाचारी म्हणाले, ज्या नेत्यांना अमित शाह भ्रष्टाचारी म्हणाले. काही दिवसानंतर त्यांना भाजपामध्ये प्रवेश देण्यात आला. मी मोहन भागवतजींना विचारू इच्छितो की, अशा प्रकारच्या राजकारशी तुम्ही सहमत आहात का? तुम्ही कधी अशा भाजपाचा विचार केला होता का?", असे केजरीवाल म्हणाले.
तुम्ही मोदीजींना कधी रोखले का? केजरीवालांचा सवाल
"भाजपचा जन्म आरएसएसपासून झाला. असे म्हटले जाते की, भाजपा पद भ्रष्ट होणार नाही, हे पाहण्याचे काम आरएसएसचे आहे. मी मोहन भागवत यांना विचारू इच्छितो की, तुम्ही भाजपाच्या आजच्या वाटचालीबद्दल सहमत आहात? हे सगळे करू नका म्हणून तुम्ही कधी मोदीजींशी बोललात का? चुकीच्या गोष्टी करण्यापासून मोदींना कधी रोखले का?", असा तिसरा सवाल केजरीवालांनी केला.
"आता 'आरएसएस'वर डोळे वटारत आहेत"
"लोकसभा निवडणुकीदरम्यान जेपी नड्डा म्हणाले होते की, भाजपाला आरएसएसची आता गरज नाही. आरएसएस भाजपाच्या आईसमान आहे. आता मुलगा इतका मोठा झाला आहे का की, आईवर डोळे वटारू लागला आहे? ज्या मुलाला भरण पोषण करून मोठे केले. ज्या मुलाला पंतप्रधान केले, आज तो मुलगा उलटून आपल्या आईवर डोळे वटारू लागला आहे. मातृतुल्य संस्था आरएसएसवर डोळे वटारत आहे. मी मोहन भागवत यांना विचारू इच्छितो की, जेव्हा नड्डाजी असे बोलले, तेव्हा तुमच्या मनाला काय वाटले, ते देशाला सांगा. तुम्हाला दुःख झाले नाही का? मी आरएसएसच्या प्रत्येक कार्यकर्त्याला विचारू इच्छितो की, नड्डाजी जेव्हा म्हणाले की, आम्हाला आरएसएसची गरज नाही, तेव्हा प्रत्येक कार्यकर्त्याला दुःख झाले नाही का?", असा सवाल केजरीवाल यांनी केला.
"मोदीजींना हा नियम लागू होत नाही, याच्याशी तुम्ही सहमत आहात का?"
केजरीवाल म्हणाले, "तुम्ही लोकांनी मिळून कायदा बनवला होता की, ७५ वर्ष झाल्यानंतर कोणताही व्यक्ती निवृत्त होईल. या कायद्यानुसार अडवाणीजींना निवृत्त करण्यात आले, मुरली मनोहरजींसारख्या मोठ्या नेत्यांना निवृत्त करण्यात आले. पी.सी. खंडुरूजींना निवृत्त करण्यात आले. कलराज मिश्र यांना निवृत्त करण्यात आले. कितीतरी लोकांना निवृत्त करण्यात आले. आता अमित शाह म्हणतात हा नियम मोदीजींना लागू होत नाही. मी मोहन भागवत यांना विचारू इच्छितो की, जो नियम अडवाणीजींना लागू झाला, तो मोदींना लागू व्हायला नको, याच्याशी तुम्ही सहमत आहात का?", असा सवाल केजरीवाल यांनी केला.