नवी दिल्ली : भारतीय सशस्त्र दलांना आगामी दशकासाठी ४०० ड्रोनची आवश्यकता आहे. यात युद्धातील पाणबुडी, रिमोटवर संचलित होणारे विमान, हाय एनर्जी लेझर आणि शत्रूचा हल्ला परतवून लावणारे आणि सॅटेलाइटलाही निष्क्रिय करणारे हाय पॉवर मायक्रोवेव्ह यांचा समावेश आहे.नव्या पिढीच्या पाणबुडी, मिसाइलला निष्क्रिय करणारे तंत्रज्ञान, पायदळाचे शस्त्र, विशेष दारूगोळा आणि रासायनिक, जैविक, रेडियोलॉजिकल आण्विक प्रणाली (सीबीआरएन) यांची आवश्यकता असल्याचे यात म्हटले आहे. यात प्रामुख्याने मानवरहित हवाई वाहनांच्या (यूएव्ही) विविधतेवर व सशस्त्र दलांसाठी ड्रोन यावर भर दिला आहे.एकाच वेळी मोठ्या संख्येच्या शत्रूंना लक्ष्य करणारे ड्रोन हे युद्धातील प्रमुख संरक्षक मानले जातात. सध्या सशस्त्र दलाकडे २०० ड्रोन आहेत. यातील बहुतांश लांब पल्ल्याचे असून, ते इस्रायलकडून आयात केले आहेत. यात इस्रायलचे ‘किलर’ व ‘कामिकजे’ड्रोनही आहेत. ते क्रूज मिसाइलप्रमाणे काम करतात.संरक्षण संशोधन व विकास संस्था (डीआरडीओ) २,६५० कोटींच्या एका योजनेवर काम करत आहे. या रोडमॅपमध्ये म्हटले आहे की, सैन्य व नौदलाला ३० हून अधिक रिमोट पायलट एअरक्राफ्टची आवश्यकता आहे. या विमानांची ३० हजार फुटांपर्यंत उडण्याची क्षमता असायला हवी. हे ड्रोन सक्षम असायला हवे. म्हणजेच २० किमी क्षेत्रातील जमिनीवरील आणि समुद्री लक्ष्य भेदण्याची क्षमता असायला हवी.
सशस्त्र दलांना हवेत ४०० ड्रोन, मानवरहित हवाई वाहनांवरही भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 12:14 AM