नवी दिल्लीः रेल्वेनं मालगाडीतल्या मालडब्यातील सामानाची सुरक्षा आणि चोरी रोखण्यासाठी पहिल्यांदाच सशस्त्र रक्षक दलाचे जवान तैनात करण्याला मंजुरी दिली आहे. सशस्त्र रक्षक दलाच्या जवानांना पूर्व रेल्वेच्या झोनमध्ये तैनात करण्यात येणार आहे. सहा महिन्यांनंतर याचा आढावा घेतला जाणार असून, त्यानंतर इतर झोनमध्ये जवानांना तैनात करण्याबाबत निर्णय होणार आहे. रेल्वे बोर्डाच्या आदेशानुसार सामानाची देखरेख करणं आणि चोरी रोखण्यासाठी सशस्त्र रक्षक दलाचे जवान तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. खरं तर 2014मध्ये मालगाड्यांमध्ये सशस्त्र दलाचे जवान तैनात करण्याला परवानगी देण्यात आली होती. परंतु त्यांना शस्त्रास्त्र सोबत बाळगण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, मालगाडीमध्ये चोरीचे जास्त प्रकार समोर आलेले नाहीत, तरीसुद्धा उद्योग जगताच्या मागणीनुसार सशस्त्र दलाच्या जवानांना तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला.मालगाडीतून सामान पाठवणारे आणि प्राप्त करणाऱ्यांना लेखी स्वरूपात स्वाक्षरी असलेले दस्तावेज पुरवले जाणार आहे. तसेच त्या दस्तावेजावर सुरक्षा कर्मचाऱ्यांची संख्या आणि सिक्युरिटी एजन्सीचं नाव देण्यात येणार आहे. तसेच मालगाडीमध्ये तैनात रक्षक केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या कायद्याचं पालन करणार आहेत. आरपीएफ, जीआरपीएफ आणि पोलिसांना सुरक्षा एजन्सी वेळोवेळी या हालचालींची माहिती देणार आहेत.
आता मालगाडीत होणार नाही चोरी, सामानाच्या देखरेखीसाठी तैनात करणार सशस्त्र रक्षक दल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2020 10:53 AM