नवी दिल्ली - भारताला अन्य देशांच्या तुलनेत आतापर्यंत शस्त्रास्त्रनिर्मितीत म्हणावे तसे यश मिळताना दिसत नाही. या कारणामुळेच शस्त्रास्त्र खरेदीमध्ये भारताला दुस-या देशांवर अवलंबून राहावं लागत आहेत. 2013ते 2017 दरम्यान शस्त्रास्त्रांची सर्वाधिक आयात करणाऱ्या देशांच्या यादीत भारत अव्वलस्थानी आहे. जगातील शस्त्रास्त्रांच्या एकूण आयातीपैकी 12 टक्के आयात एकटा भारत करतो. 'टाईम्स ऑफ इंडिया'नं दिलेल्या वृत्तानुसार, इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (आयपीआरआय) या संस्थेने सोमवारी जगभरातील देशांकडून होणाऱ्या शस्त्रास्त्र खरेदीचा अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालामध्ये 2008 ते 2012 च्या तुलनेत 2013 ते 2017 या कालावधीत भारताच्या शस्त्रास्त्रांच्या आयातीमध्ये 24 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
भारतापाठोपाठ सौदी अरेबिया दुसऱ्या स्थानी आहे. तर इजिप्त, संयुक्त अरब अमिरात, चीन, ऑस्ट्रेलिया, अल्जेरिया, इराक आणि पाकिस्तान अशी देशांची क्रमवारी आहे. भारतानं 62 टक्के शस्त्रास्त्रे रशियाकडून खरेदी केली आहेत. तर अमेरिकेकडून 15 टक्के आणि इस्रायलकडून 11 टक्के शस्त्रास्त्रांची खरेदी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे, जागतिक स्तरावर चीनचा वाढता प्रभाव पाहता अमेरिकेनं देखील आधीच्या तुलनेत भारताला शस्त्रास्त्र विक्री करण्याचं प्रमाण वाढवलं आहे. 2008 ते 2012च्या तुलनेत 2013 ते 2017 या कालावधीत अमेरिकेकडून भारतात आयात करण्यात येणा-या शस्त्रास्त्रांचं प्रमाण 557 टक्क्यांनी वाढलं आहे. गेल्या एका दशकात अमेरिका आणि भारतामध्ये 15 बिलियन डॉलर शस्त्रास्त्रांचा करार झाला आहे.