नियंत्रण रेषेपलिकडे पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या लॉन्च पॅडवरून सुमारे २५० ते ३०० दहशतवादी जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत. बीएसएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबतची माहिती दिली आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, सुरक्षा दलं सतर्क आहेत. तसेच सीमेपलीकडून कुठल्याही प्रकारच्या घुसखोरीच्या प्रयत्नाला हाणून पाडले जाईल.
बीएसएफचे महासंचालक अशोक यादव यांनी दक्षिण काश्मीरमधील पुलवामा येथे सांगितले की, मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार २५० ते ३०० दहशतवादी हे लाँचपॅडवरून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आमच्याकडून आणि लष्कराकडून सर्व संवेदनशील ठिकाणांवर करडी नजर ठेवली जात आहे.
त्यांनी सांगितले की, बीएसएफ आणि लष्कराचे जवान हे सीमेलगतच्या भागात सतर्क आहेत. तसेच घुसखोरीचा कुठलाही प्रयत्न निष्फळ ठरवतील. आम्ही घुसखोरीचा कुठलाही प्रयत्न निष्फळ ठरवण्याबाबत निश्चिंत आहोत, असेही त्यांनी सांगितले. तर बीएसएफच्या महासंचालकांनी सांगितले की, मागच्या काही वर्षांमध्ये सुरक्षा दल आणि काश्मीरमधील लोकांमध्ये जवळीक वाढली आहे. जर लोकांनी आम्हाला सहकार्य केलं, तर आम्ही विकासात्मक कामं अधिक उत्तमपणे पुढे नेऊ शकतो.