श्रीनगर - काश्मीरमधील सुंजवा लष्करी तळावर सुरु असलेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा पथकाला यश आले आहे. लष्कराच्या कारवाईत दोन दहशतवादी ठार झाले असून एके-47, एके-56 रायफल आणि अन्य शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
शनिवारी पहाटेच्या सुमारास दहशतवादी सुंजवा लष्करी तळावर घुसले व हल्ला केला. दोन ते तीन दहशतवादी असण्याची शक्यता आहे. लष्कराची पहाटेपासून या दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरु आहे. या तळावर रहिवाशी वस्ती असल्याने सुरक्षा पथकांना आणखी जिवीतहानी होणार नाही याची काळजी घेऊन कारवाई करावी लागत आहे.
या हल्ल्यात ज्युनिअर कमिशनर दर्जाच्या अधिकाऱ्यासह दोन भारतीय जवान शहीद झाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, या हल्ल्यामागे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा हात असण्याची शक्यता आहे.
शहीद झालेल्या जवानांमध्ये जेसीओ मदन लाल चौधरी यांचा समावेश आहे. दहशतवाद्यांनी पहाटे केलेल्या गोळीबारात ते आणि त्यांची मुलगी जखमी झाली होती. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान चौधरी यांचा मृत्यू झाला.
जम्मू-पठाणकोट महामार्गानजीक असणाऱ्या सुंजवा लष्करी तळावर पावणे पाच वाजता हा हल्ला झाला. लष्करी तळाच्या जवळ पहाटेपासून काही संशयास्पद हालचाली जाणवत होत्या. पहाटे पावणे पाचच्या सुमारास सुंजवा लष्करी कॅम्पवर दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरू झाला. यावेळी दहशतवादी जवळच्या रहिवासी इमारतीमध्ये लपून बसले. त्यानंतर भारतीय लष्कराने हा संपूर्ण परिसर खाली करून कारवाईला सुरूवात केली. काही तास दोन्ही दिशेने गोळीबार सुरू होता. यामध्ये दोन दहशतवादी ठार झाले आहेत. मात्र, दहशतवाद्यांची नेमकी संख्या माहिती नसल्यामुळे सध्या लष्कराकडून ड्रोनद्वारे संबंधित परिसराची पाहणी सुरु आहे.
9 फेब्रुवारी 2013 रोजी अफजल गुरूला फाशी दिल्याच्या घटनेला यंदा पाच वर्ष पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर गुप्तचर यंत्रणांनी अशाप्रकारच्या हल्ल्याचा इशारा सुरक्षा दलांना दिला होता. गेल्या काही दिवसांमध्ये काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून मोठ्याप्रमाणावर शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. तर दहशतवाद्यांकडून लष्करी तळांना लक्ष्य करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वी 5 फेब्रुवारीला दहशतवाद्यांनी पुलवामाच्या काकापुरा येथील 50व्या राष्ट्रीय रायफल्सच्या छावणीवर हल्ला केला होता. यावेळी दहशतवाद्यांकडून गोळीबार आणि ग्रेनेडस् फेकण्यात आले होते. या हल्ल्यात भारतीय जवानांना कोणतीही इजा झाली नसली तरी दहशतवादी येथून पळून जाण्यात यशस्वी झाले होते.