ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 14 - जम्मू काश्मीरमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांना तरुणांकडून मारहाण केली जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता ओमर अब्दुल्ला यांनी काही फोटो आणि व्हिडीओ ट्विट करत घटनेला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला आहे. जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी काही फोटोंसहित एक व्हिडीओ ट्विट केला आहे ज्यामध्ये लष्कराच्या जीपवर एका काश्मिरी तरुणाला बांधण्यात आलं आहे. कोणीही दगडफेक करु नये यासाठी या तरुणाला जीपवर बांधण्यात आलं होतं ? असा सवाल उपस्थित करत हे खूपच धक्कादायक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
फोटो ट्विट केल्यानंतर ओमर अब्दुल्ला यांनी 15 सेकंदाचा एक व्हिडीओही ट्विट केला आहे. या व्हिडीओमध्ये एका तरुणाला जीपला घट्ट बांधलं असून लाऊडस्पिकरवरुन " दगडफेक करणा-या काश्मिरींची अशी गत होईल" अशा पद्धतीची चेतावणी दिली जात आहे. याची तात्काळ चौकशी झाली पाहिजे असं ओमर अब्दुल्ला यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
Here"s the video as well. A warning can be heard saying stone pelters will meet this fate. This requires an urgent inquiry & follow up NOW!! pic.twitter.com/qj1rnCVazn— Omar Abdullah (@abdullah_omar) April 14, 2017
या व्हिडीओमध्ये जीपच्या मागे लष्कराचा एक ट्रकही जाताना दिसत आहे. या व्हिडीओवर लष्कराने प्रतिक्रिया दिली असून या व्हिडीओची सत्यता तपासली जात असल्याचं सांगितलं आहे.
ओमर अब्दुल्ला यांनी व्हिडीओ ट्विट केल्यानंतर अनेकांनी प्रश्चचिन्ह उपस्थित करत सीआरपीएफ जवानांना मारहाण झालेला व्हिडीओ का शेअर केला नाही अशी विचारणा केली. तुम्ही तोदेखील शेअर केला पाहिजे असं म्हटलं. यावर उत्तर देताना ओमर अब्दुल्ला यांनी सांगितलं की, "त्या व्हिडीओचं उदाहरण देत हा व्हिडीओ खोटा ठरवला जाऊ शकत नाही. दगडफेक करतात तेच वर्तन लष्कराकडून अपेक्षित ठेवावं का ?".
"सीआरपीएफ जवानांना मारहाण झाल्यानंतर व्यक्त होणार संताप समझू शकतो. पण तरुणाला जीपवर बांधलेला व्हिडीओ पाहिल्यानंतर तोच राग दिसणार नाही याची मला खंत आहे", असं त्यांनी पुढच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
दुसरीकडे ओमर अब्दुल्ला यांचे वडिल फारुख अब्दुल्ला यांनी, "दगडफेक करणा-यांना कदाचित सरकारकडून पैसा मिळत असावा, जेणेकरुन जिथे लोक मतदान करण्यासाठी बाहेर पडत आहेत त्यांनी घाबरुन बाहेर पडू नये". राज्यात नुकत्याच पार पडलेल्या पोटनिवडणुकीत घसरलेल्या मतदान टक्केवारीकडे त्यांचा इशारा होता.
श्रीनगरमध्ये रस्त्यावर शांतपणे चालत असलेल्या सीआरपीएफच्या जवानांना मारहाण करणा-या नराधमांची ओळख पटली असून कारवाईला सुरुवात झाली आहे. जवानांवर हात उचलून त्यांच्या देशसेवेचा अपमान करणा-या काश्मिरी तरुणांना जेरबंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. जवानांवर हात उचलणारे काश्मिरी तरुण बडगाम जिल्ह्यातील क्रालपोरा परिसरातील राहणारे आहेत. पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाच्या चौकशीसाठी सीआरपीएफचे महासंचालक शुक्रवारी श्रीनगरला जाणार आहेत. दरम्यान गुरुवारी सीआरपीएफने केलेल्या तक्रारीनंतर एफआयआर दाखल करण्यात आला होता.