Doda Encounter :जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात बुधवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराचा उत्तराखंडमधील एक कॅप्टन शहीद झाला. तर या चकमकीत चार दहशतवादी ठार झाले. डोडा येथे शहीद झालेले २५ वर्षीय कॅप्टन दीपक सिंह हे ४८ राष्ट्रीय रायफल्सचे सदस्य होते. लष्कराने डोडा भागात दहशतवादविरोधी कारवाई सुरु केली होती. दरम्यान, डोडा जिल्ह्यात गेल्या महिन्यातच दहशतवाद्यांसोबत चकमक झाली होती. या चकमकीत गंभीर जखमी झालेल्या अधिकाऱ्यासह पाच जवानांचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला होता. त्यानंतर आता झालेल्या चकमकीत कॅप्टन दीपक सिंह यांना वीरमरण आलं आहे.
डोडा जिल्ह्यातल्या या चकमकीत भारतीय लष्कराच्या ४८ राष्ट्रीय रायफल्सचे कॅप्टन दीपक सिंह शहीद झाले आहेत. लष्करी अधिकारी असण्यासोबतच कॅप्टन दीपक सिंह हे एक हुशार हॉकीपटूही होते. शहीद कॅप्टन दीपक सिंह हे काउंटर इन्सर्जन्सी ४८ राष्ट्रीय रायफल्समध्ये सिग्नल ऑफिसर म्हणून तैनात होते. डोडाच्या अस्सारमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेणाऱ्या क्विक रिॲक्शन टीमचे ते नेतृत्व करत होते. यावेळी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत ते शहीद झाले.
कॅप्टन दीपकचे कुटुंब रेसकोर्स, दून येथे राहते. कॅप्टन दीपक १३ जून २०२० रोजी सैन्यात दाखल झाले. त्यांचे पार्थिव गुरुवारी दून येथे आणण्यात येणार आहे. शोध मोहिमेत कंपनीचे नेतृत्व करण्यासाठी कॅप्टन दीपक सिंह यांना फील्ड मेजर बनवण्यात आले होते. आपल्या कंपनीचे नेतृत्व करत असताना त्यांनी रणांगणात शहीद होण्यापूर्वी दहशतवाद्याला ठार केले. राष्ट्रीय रायफल्समध्ये कॅप्टन असण्यासोबतच ते एक हुशार हॉकीपटूही होते.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवगढ-असर पट्ट्यात लपलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दल आणि पोलिसांनी परिसराला वेढा घातला आणि संयुक्त शोध मोहीम सुरू केली होती. यादरम्यान घनदाट जंगलात त्यांच्यात जोरदार चकमक झाली. दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत कॅप्टन दीपक गंभीर जखमी झाले. त्यांना लष्करी रुग्णालयात नेण्यात आले, तिथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.