नवी दिल्ली - जम्मू काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे हनन होत असल्याचा संयुक्त राष्ट्रांनी दिलेला अहवाल लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी फेटाळून लावला आहे. मानवाधिकारांच्या जपणुकीबाबतचा आमचा इतिहास संपूर्ण जगाला ठावूक आहे. काही अहवाल हे विशिष्ट्य हेतूने प्रेरित असतात. काश्मीरची जनता आणि आंतरराष्ट्रीय समुहालाही मानवाधिकारांबाबतची आमची भूमिका माहित आहे. त्यामुळे या अहवालाबाबत आम्ही जास्त विचार करणार नाही. मानवाधिकारांबाबतचे आमचे रेकॉर्ट खूप चांगले आहे. जम्मू-काश्मीरमधील मानवाधिकारांच्या हननाबाबत संयुक्त राष्ट्रांनी गेल्या आठवड्यात अहवाल प्रसिद्ध केला होता. तसेच या प्रकरणी तपास करण्यासाठी आंतरराष्ट्रीय तपास आयोग बनवण्याचीही शिफासर केली आहे. 2016 पासून काश्मीर खोऱ्यात सुरू झालेल्या विरोधी आंदोलनांना रोखण्यासाठी भारतीय लष्कराने अधिकाधिक बळाचा वापर केला, असे या अहवाला म्हटले होते. या अहवालात हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बु-हान वाणीला भारतीय सुरक्षा जवानांनी ठार केल्याचाही उल्लेख करण्यात आला होता. तसेच काश्मीरमध्ये नागरिकांचं अपहरण, हत्या आणि हिसेंसारख्या प्रकारांच्या माध्यमातून मानवाधिकारांचं उल्लंघन सुरू असल्याचंही या अहवालातून स्पष्ट करण्यात आले होते. दरम्यान, संयुक्त राष्ट्रांनी काश्मीरसंदर्भात दिलेला अहवाल चुकीचा आणि पक्षपाती असल्याचं भारताने म्हटले आहे. तसेच संयुक्त राष्ट्रानं एक प्रकारे आमच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेवर हल्ला केल्याचा आरोपही भारतानं केला आहे.
लष्कर प्रमुख बिपीन रावत यांना फेटाळला काश्मिरबाबतचा संयुक्त राष्ट्रांचा अहवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2018 1:57 PM