श्रीनगर - भारतीय लष्कर प्रमुख बिपीन रावत सध्या जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. शनिवारी रावत यांनी नियंत्रण रेषेवरून पाक व्याप्त काश्मीरमधील स्थितीचा आढावा घेतला. हातात दूरबीन पकडून त्यांनी पाकिस्तानी सैन्याच्या हालचालींवर नजर ठेवली. शुक्रवारी काश्मीर खोऱ्यातील सुरक्षेचा आढावा घेऊन सीमेवर तैनात असलेल्या जवानांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी पाकिस्तानच्या नापाक हरकती आणि घुसखोरांना रोखण्यासाठीची रणनीती यावर चर्चा केली.
जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला आहे. त्यामुळे पाकिस्तानकडून सीमेवर हालचाली सुरू झाल्या आहेत. एकीकडे काश्मीर मुद्द्यावरून पाकिस्तान आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताविरोधात कुटनीतीचा अवलंब करत आहे. मात्र चीनशिवाय कोणताही देश पाकिस्तानच्या मागे उभे राहताना दिसत नसल्याने पाकिस्तान सैरभैर झाला आहे.
पाकच्या मंत्र्यांपासून ते पंतप्रधान इम्रान खान यांच्यापर्यंत अनेकजण भारतासोबत युद्धाची भाषा बोलू लागलेत. तर जगाने काश्मीरकडे लक्ष दिले नाही तर भारत-पाक युद्धाचे परिणाम जगाला भोगावे लागतील अशा पोकळ धमक्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान देत आहेत. एकंदर या सगळ्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कर सतर्क असून कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारत सज्ज आहे असा संदेश भारतीय लष्कराकडून दिला जात आहे. लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी भारतीय जवानांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पाकच्या नापाक हरकती रोखण्यासाठी जवानांना मार्गदर्शन केले.
त्याचसोबत श्रीनगरमधील लष्कराच्या मुख्यालयात उच्चस्तरीय बैठक बोलविण्यात आली. त्यात दहशतवादाविरोधात लढण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दहशतवाद्यांच्या प्रत्येक हालचालींवर भारताची करडी नजर आहे. दहशतवाद्यांना फणा काढू नये यासाठी भारतीय लष्कराकडून त्यांच्यावर दबाव कायम ठेवण्यात आला आहे. तसेच लोकांमध्ये जनजागृती करण्याचे कार्यक्रमही लष्कराकडून आयोजित करण्यात आले आहे.
तर दुसरीकडे पाकिस्तानने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे आर्थिक निधीसाठी प्रस्ताव ठेवला आहे. सूत्रांनी सांगितल्यानुसार अमेरिका जेवढा खर्च अफगाणिस्तानावर करते, त्याचा निम्मा खर्च पाकिस्तानला दिला तर अफगाणिस्तानात शांतता राखण्याची गॅरंटी पाकिस्तान घेईल असं सांगण्यात आलं आहे त्यामुळे भारताने अधिकाधिक सतर्कता पाळण्याचं ठरवलं आहे.