नवी दिल्ली - लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे (MM Naravane) यांनी जम्मू -काश्मीरमधील व्हाइट नाईट कोरच्या पुढील भागाचा दौरा केला. याच बरोबर त्यांनी नियंत्रण रेषेवरील परिस्थितीचाही आढावा घेतला. लष्करी कमांडर्सनी त्यांना सध्यस्थिती आणि घुसखोरीविरोधातील कारवाईसंदर्भात माहिती दिली. नरवणे यांचा हा दौरा अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. (Army chief general Naravane visited forward areas of LOC)
लष्करप्रमुख एमएम नरवणे, पुंछमध्ये नऊ जवानांना आलेले हौतात्म्य आणि दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेल्या कारवाई दरम्यान दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी त्यांनी लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक केली आणि सुरक्षा स्थितीचा आढावा घेतला. येथे त्यांच्यासोबत व्हाइट नाइट कोरचे जीओसी, नॉर्दर्न कमांडचे जीओसी आणि इतर अधिकारीही होते. यानंतर ते नगरोटा लष्करी मुख्यालयत गेले. नरवणे यांनी, पुंछमध्ये घेरलेले दहशतवादी कोणत्याही परिस्थितीत पळून जाता कामा नयेत, असे लष्कराच्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे.
पुंछमध्ये अतिरिक्त पॅरा कमांडो आणि लष्कराचे जवान तैनात - सूत्रांनी दिलेल्या माहतीनुसार, पुंछमध्ये अतिरिक्त पॅरा कमांडो आणि सैन्य कर्मचाऱ्यांना पाठविण्यात आले आहे. जंगलात लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेऊन, संपूर्ण खबरदारी घेत, ऑपरेशन संपविण्याच्या रणनीतीचा भाग म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे.
नऊ जवानांना वीरमरण -पुंछमधील सुरनकोटमध्ये गेल्या सोमवारपासून सुरू असलेल्या चकमकीमध्ये नऊ जवानांना वीरमरण आले आहे. दरम्यान या चकमकीची व्याप्ती पुंछमधील मेंढर आणि राजौरीच्या थानामंडीपर्यंत आहे. नियंत्रण रेषेजवळ पुंछच्या डेरावाली गली परिसरामध्ये १० ऑक्टोबरच्या रात्री, या दहशतवाद्यांसोबत झालेल्या पहिल्या चकमकीत एका जेसीओसह पाच जवानांना वीरमरण आले होते. त्यानंतर गुरुवारी नरखासच्या जंगलात दहशतवाद्यांचा शोध घेत असलेल्या लष्कराच्या एका तुकडीवर दहशतवाद्यांनी दबा धरून हल्ला केला. यामध्ये दोन जवानांना वीरमरण आले, तर एका जेसीओसह अन्य दोघेजण बेपत्ता झाले. दोन दिवस चाललेल्या शोधमोहिमेनंतर त्यांचे मृतदेह सापडले.