नवी दिल्ली: गेल्या काही दिवासंपासून भारत-चीन सीमावादावरील तोडगा काढण्यासाठी पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या असून, दुसरीकडे पाकिस्तानच्या कुरापती वाढताना दिसत आहे. भारताच्या या दोन्ही सीमांवरील सद्य परिस्थितीबाबत देशाचे लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनी माहिती दिली. दहशतवादाच्या मुद्द्यावरून लष्करप्रमुख नरवणे यांनी पाकिस्तानला सज्जड दम दिला असून, कारवाईसाठी भाग पाडल्यास मोठी किंमत वसूल करू, असे नरवणे यांनी स्पष्टपणे सांगितले.
भारत आणि चीन सीमावादावरून दोन्ही देशांदरम्यान १४ वी सैन्यस्तरावरील चर्चा आयोजित करण्यात आली होती. या चर्चेमध्ये लष्करप्रमुख नरवणे हेही सहभागी झाले होते. यानंतर नरवणे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सीमाभागातील घुसघोरी आणि पाकिस्तान, तसेच चीनसोबतचे भारताचे संबंध याविषयी भूमिका स्पष्ट केली.
आम्ही दहशतवाद खपवून घेणार नाही
पश्चिमेकडील सीमाभागात, विशेषत: नियंत्रण रेषेजवळ बराच काळ परिस्थिती तणावपूर्ण होती. सध्या परिस्थितीत सुधारणा होत आहे. पण तरीही या भागात दहशतवादी कारवाया वाढू लागल्या असून, नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे पश्चिमेकडील शेजारी देशाचे सुप्त मनसुबे यातून उघड होत आहेत हे वेगळे सांगायची गरज नाही. पण आम्ही दहशतवाद खपवून घेणार नाही. जर आम्हाला भाग पाडण्यात आले, तर याची गंभीर किंमत वसूल केली जाईल, या शब्दांत नरवणे यांनी परखडपणे सुनावले आहे.
संघर्ष हा शेवटचा पर्याय, तो झाला तर विजय आमचाच
गेल्या वर्षी जानेवारी महिन्यापासून उत्तर आणि पश्चिमेकडच्या सीमाभागात सकारात्मक घडामोडी घडत आहेत. एकीकडे आम्ही चर्चेच्या मार्गाने शांतता आणण्याचा प्रयत्न करत असतानाच उत्तरेकडच्या सीमारेषेवर भारतीय लष्कर कोणत्याही प्रकारच्या कारवाईसाठी सज्ज आहे. संघर्ष हा शेवटचा पर्याय असून, तो झालाच तर त्यात विजय आमचाच असेल, असेही नरवणे यांनी नमूद केले.