नवी दिल्ली - लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे हे नेपाळशी असलेले संबंध आणखी मजबूत करण्यासाठी ३ नोव्हेंबरपासून या हिमालयीन देशाच्या तीन दिवसीय दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात ते नेपाळी समपदस्थ जनरल पूर्णचंद्र थापा यांच्यासमवेत नेपाळचे ज्येष्ठ लष्करीआणि इतर अधिकाऱयांसमवेत चर्चा करणार आहेत. दोनही देशात सुमारे १,८०० किलोमीटर लांबीची सीमा असून, त्याचे व्यवस्थापन, सहकार्य यासारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर व्यापक चर्चा करणार आहेत. मागील मे महिन्यात नेपाळने एक वादग्रस्त नकाशा जारी करून भारताचा काही भाग त्या देशात दाखवले होते. तेव्हापासून दोन्हीदेशात तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर दोहोंतील हा पहिला उच्चस्तरीय दौरा असेल. उच्चपदस्थ सरकारी सूत्रांनी सांगितले की, लष्करप्रमुख नरवणे हे दोन्ही देशातील संरक्षण आणि संरक्षणाच्या क्षेत्रातील संबंध आणखी मजबूत करण्याच्या उद्देशाने चार ते सहा नोव्हेंबर या कालावधीत नेपाळचा दौरा करणार आहेत.वर्ष १९५०मध्ये सुरू झालेली परपरा कायम ठेवत काठमांडूमधील एका कार्यक्रमात नेपाळचे राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी ह्या जनरल नरवणे यांना नेपाळी सेनेच्या जनरलच्या मानद रँकने सन्मानित करणार आहेत. भारतही नेपाळच्या सनाेप्रमुखाना भारतीय सेनेचे जनरल हा मानद रँक देत आलेला आहे. चीन या क्षेत्रात आपली ताकद वाढवत असताना भारत आपल्या शेजारी देश म्यानमार, मालदीव, बांगलादेश, श्रीलंका, भूतान, अफगाणिस्तान यांच्यासमवेतचे संबंध पुन्हा एकदा मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहे. याचाच एक भाग म्हणून महिन्याच्या सुरुवातीला जनरल नरवणेंनी विदेश सचिव हर्षवर्धन शृंगला यांच्यासमवेत म्यानमारचा दौरा केला होता. समग्र रणनीतिक हितांसंदर्भात नेपाळ भारतासाठी महत्वपूर्ण आहे. दोन्ही देशात जुन्या काळापासून रोटी- बेटी व्यवहारही झालेले आहेत.
लष्करप्रमुख नरवणे तीन दिवसांच्या नेपाळ दौऱ्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2020 3:11 AM