उधमपूर: प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या पलिकडे जाऊन तेथील दहशतवादी तळांवर केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राइक्स’नंतर सीमाभागातील तणावपूर्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख जनरल दलबीर सिंग सुहाग यांनी शनिवारी भारतीय लष्कराच्या येथील उत्तर कमांडच्या मुख्यालयास भेट देऊन सज्जतेचा आढावा घेतला. जनरल सिंग यांनी सकाळी उत्तर कमांड मुख्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सीमेवरील व एकूणच जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीचा व सज्जतेचा आढावा घेतला. पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या सात तळांवर हल्ला करण्याची जोखमीची कामगिरी लष्कराच्या उत्तर कमांडनेच पार पाडली होती. दहशतवाद्यांची ‘लॉँच पॅड्स’ उध्वस्त करण्याची मोहिम फत्ते करणाऱ्या अधिकारी व जवानांचे लष्करप्रमुखांनी व्यक्तिश: कौतुकही केले. जनरल सिंग यांनी पंजाबमध्ये चांदीमंदिर येथे पश्चिम कमांड मुख्यालयास भेट देऊन तेथील स्थिती व लष्करी तुकड्यांच्या तयारीचा आढावा घेतला. (वृत्तसंस्था)उरीच्या कमांडरना हटविलेसीमेपलिकडून आलेल्या दहशतवाद्यांनी हल्ला केलेल्या उत्तर काश्मीरमधील उरी येथील लष्कराच्या ब्रिगेडचे प्रमुख ब्रिगेडियर के. सोमशंकर यांना त्या पदावरून हटविण्यात आले असून त्यांच्याजागी अलिकडेच ब्रगेडियर म्हणून बढती मिळालेले किलो फोर्सचे कमांडर एस. पी. अहलावत यांची नेमणूक करण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते. सीमा ओलांडून दहशतवाद्यांच्या तुकड्या घुसल्या आहेत व ते उरी येथे हल्ला करू शकतात, अशी पक्की गुप्तवार्ता उरीचा हल्ला होण्याच्या सुमारे १० दिवस आधी दिली गेली होती. पण ती गांभीर्याने घेतली नाही, असे हल्ल्याच्या दिवशी समोर आले होते.खुद्द संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनीही ‘उरीमध्ये थोडे चुकलेच’, अशी कबुलीही दिली होती. लष्कराने याची अंतर्गत चौकशी सुरु केली असून ती पूर्ण होईपर्यंत ब्रिगेडियर सोमशंकर यांना उरीच्या बाहेर ठेवण्यात येणार असल्याचे समजते.भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून तेथील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर केलेल्या ‘सर्जिकल ट्राइक्स’ने पाकिस्तान ‘कोमा’मध्ये गेले आहे. पाकिस्तानने पुन्हा भारतावर (उरीसारखा) हदशतवादी हल्ल्याचे दु:साहस केले तर त्यालाही असेच चोख प्रत्त्युत्तर दिले जाईल. -मनोहर पर्रिकर, संरक्षणमंत्री
लष्करप्रमुख सुहाग यांनी घेतला सज्जतेचा आढावा
By admin | Published: October 02, 2016 12:23 AM