ऑनलाइन लोकमत
श्रीनगर/नवी दिल्ली, दि. 26 - कुख्यात दहशतवादी बुऱ्हाण वानीला ठार मारणाऱ्या तीन सैनिकांना सेना पदकांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या राष्ट्रीय रायफल्सच्या दक्षिण काश्मीरमधील युनिटमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
गतवर्षी 8 जुलै रोजी मेजर संदीप कुमार यांच्या नेतृत्वाखालील लष्कराच्या पथकाला सरताझ अझीझ आणि अन्य दोन दहशतवादी बम्डूरा गावात लपल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर या पथकाने केलेल्या कारवाईत बुऱ्हाण वानी आणि बाकीचे दोन दहशतवादी मारले गेले होते.
बुऱ्हाण वानीविरोधात कारवाई करताना लष्कराच्या या अभियानाची बातमी फुटल्याने लष्कराला फुटीरतावाद्यांच्या विरोधाचा सामना करावा लागला होता. जवानांवर दगडफेकही झाली. मात्र गोळीबार करून पळण्याचा प्रयत्न करत असलेला बुऱ्हाण अखेर मारला गेला होता. बुऱ्हाण वानीला ठार मारल्यानंतर काश्मीरमध्ये उसळलेल्या हिंसाचारात अनेकांचा बळी गेला.