नवी दिल्ली - लष्कर दिनानिमित्त आज झालेल्या संचलनामध्ये लष्कराने शक्तिप्रदर्शन केले. यावेळी भारतीय लष्कराने प्रथमच आपल्याकडे असलेल्या ड्रोनची क्षमता जगासमोर आणली. हे ड्रोन कुठल्याही मानवी नियंत्रणाविना शत्रूच्या ठिकाणांना कशाप्रकारे लक्ष्य करू हे लष्कराने यावेळी दाखवून दिले. अनेक ड्रोन एकत्र मिळून एका मोहिमेला तडीस नेतात. या सिस्टिमला ड्रोन स्वॉर्मिंग असे म्हणतात. हे नवे तंत्रज्ञान भविष्यामध्ये युद्धाचे संपूर्ण चित्र बदलू शकते. नो कॉन्टॅक्ट वॉरफेअर म्हणजेच कुठल्याही कॉन्टॅक्टविना होणाऱ्या युद्धात हे हत्यार अत्यंत प्रभावी ठरेल.
लष्कर दिनी झालेल्या संचलनावेळी अनेक ड्रोननी मिळून शत्रूचे टँक, दहशतवाद्यांचे तळ, हॅलिपॅट, फ्यूल स्टेशनसह अनेक ठिकाणांना लक्ष्य करण्याचे प्रात्यक्षिक दाखवले. यामध्ये एकूण ७५ ड्रोन सहभागी झाले होते. यामध्ये दाखवण्यात आले की, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून हे ड्रोन कुठल्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय शत्रूच्या प्रदेशातील ५० किमी आतपर्यंत गेले आणि लक्ष्य ओळखून ते उदध्वस्त केले. या सिस्टिममध्ये सर्व ड्रोन एकमेकांशी संपर्क साधत एकत्र मिळून मोहीम पूर्ण करतात.
भारतीय लष्कराने स्वदेशी कंपन्यांसोबत मिळून ड्रोन स्वॉर्मिंग प्रणालीचे प्रदर्शन केले. हे आत्मनिर्भर भारताच्या दिशेने टाकलेल्या एका पावलाचे प्रतीक आहे. तसेच भविष्यात युद्ध कशा प्रकारे लढले जाईल याची झलक या माध्यमातून दाखवण्यात आली. आता अशा प्रकारचे तंत्रज्ञान हे जगभरातील युद्धाची पद्धत बदलत आहे.
आजच्या संचलनामध्ये मदर ड्रोन सिस्टिमसुद्धा दाखवण्यात आली. यामध्ये एका मदर ड्रोनमधून चार चाइल्ड ड्रोन बाहेर येतात. या ड्रोनचे लक्ष्य वेगवेगळे असते. हे चाइल्ड ड्रोन आपल्या लक्ष्याचा अचूकपणे भेद करतात.
ऑफेंसिव्ह ड्रोन ऑपरेशनच्या माध्यमातून भारतीय लष्कराने भारत तंत्रज्ञानाच्या बाबतीत पुढे जात असल्याचे दाखवले. ड्रोन हे केवळ शत्रूच्या ठिकाण्यांना लक्ष्य करण्यासाठी नाही तर पॅरा ड्रॉपिंगसाठीही उपयोगात आणता येऊ शकतात. ड्रोनच्या माध्यमातून कुठलेही सामाना पॅराशूटमधून ड्रॉप करण्याबरोबरच हे ड्रोन सामान घेऊ स्वत:ही उतरू शकतात. तसेच लँड झाल्यानंतर यांची सिस्टीम आपोआप बंद होऊ शकते.
तिथे असलेले सैनिक आलेले सामान घेऊन दुसरे सामान त्या ड्रोनमध्ये भरू शकतो. त्यानंतर हे ड्रोन आपोआप सुरू होईल आणि आपल्या निश्चित ठिकाणी पोहोचू शकते. भारतीय सैनिक अनेक अशा ठिकाणी तैनात आहेत. जिथे हवामान प्रतिकूल असते. अशा ठिकाणी हे ड्रोन उपयुक्त ठरू शकतात.