नवी दिल्ली-७५ व्या आर्मी डे परेडच्या निमित्ताने देशाचे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी पुन्हा एकदा चीनला इशारा दिला आहे. ते म्हणाले की एलएलसीवरील कोणत्याही कृत्याला सामोरे जाण्यासाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत. "गेल्या वर्षभरात लष्कराने सुरक्षेच्या आव्हानांचा खंबीरपणे सामना केला आहे. सीमांची सक्रिय आणि जोमाने सुरक्षा सुनिश्चित केली. सैन्याने क्षमता विकास, सैन्याची पुनर्रचना आणि प्रशिक्षण सुधारण्यासाठी पावले उचलली आहेत. भविष्यातील युद्धासाठी आमची तयारी आणखी मजबूत केली आहे", असं जनरल मनोज पांडे म्हणाले.
लष्करप्रमुख म्हणाले की, उत्तर सीमावर्ती भागातील परिस्थिती सामान्य आहे. प्रोटोकॉल आणि यंत्रणांद्वारे शांतता राखण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यात आली आहेत. LAC वर मजबूत संरक्षण पोझिशन राखताना, आम्ही कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार आहोत. तसंच कठीण प्रदेश आणि खराब हवामान असूनही आमचे शूर सैनिक तैनात आहेत. त्यांना सर्व प्रकारची शस्त्रे, उपकरणे आणि सुविधा पुरेशा प्रमाणात दिल्या जात आहेत. स्थानिक प्रशासन, इतर यंत्रणा आणि लष्कर यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे पायाभूत सुविधांच्या विकासात सुधारणा झाली आहे, असंही ते पुढे म्हणाले.
पाकिस्तानच्या सीमेवर युद्धविरामलष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनीही पाकिस्तानला लागून असलेल्या सीमेबाबत मोठे भाष्य केले. ते म्हणाले की, पश्चिम सीमावर्ती भागात नियंत्रण रेषेवर युद्धविराम सुरू आहे आणि युद्धविराम उल्लंघनात घट झाली आहे, परंतु सीमेपलीकडील दहशतवादी पायाभूत सुविधा अजूनही कायम आहेत. बेंगळुरू येथील एमईजी अँड सेंटर येथे आर्मी डे परेडचे आयोजन केले गेले, जिथं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. लष्कराच्या सदर्न कमांडच्या देखरेखीखाली आजची परेड आयोजित करण्यात आली आहे. याशिवाय देशाच्या इतर भागात असलेल्या लष्कराच्या छावण्यांमध्येही अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दरवर्षी १५ जानेवारीला 'आर्मी डे' साजरा केला जातो. १९४९ मध्ये या दिवशी जनरल केएम करिअप्पा यांनी लष्कराचे पहिले भारतीय कमांडर-इन-चीफ म्हणून पदभार स्वीकारला. ज्यांनी देशासाठी बलिदान दिले त्यांना श्रद्धांजली म्हणून मद्रास अभियांत्रिकी युद्ध स्मारकावर पुष्पहार अर्पण करून सुरू झालेल्या कार्यक्रमाला भारतीय लष्करप्रमुख मेजर जनरल मनोज पांडेही उपस्थित होते.
वेपन सिस्टमचंही प्रदर्शन'आर्मी डे'च्या परेडमध्ये आर्मी सर्व्हिस कॉर्प्समधील लष्कर आणि ५ रेजिमेंटल बँड असलेल्या लष्करी बँडसह आठ तुकड्या दिसणार आहेत, असे मेजर जनरल रवी मुरुगन यांनी सांगितले. परेड दरम्यान आर्मी एव्हिएशन ध्रुव आणि रुद्र हेलिकॉप्टर फ्लाय-पास्ट करताना दिसतील. यादरम्यान लष्कराच्या शस्त्र प्रणालीचंही प्रदर्शन करण्यात येणार आहे.