काश्मीर- गेल्या वर्षी दहशतवाद्यांनी अपहरण करून हत्या केलेल्या राष्ट्रीय रायफल्सचे जवान औरंगजेबाच्या हत्येप्रकरणी तीन जवानांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या संशयित आरोपी जवानांकडून सध्या चौकशी सुरू आहे. या तीन अधिकाऱ्यांवर औरंगजेबाच्या हत्येच्या कटात सामील असल्याचा आरोप आहे. दहशतवाद्यांना औरंगजेबाच्या येण्या-जाण्याची सूचना हे तीन जवान दहशतवाद्यांना देत होते, असा लष्कराला संशय आहे. त्या तीन जवानांच्या मदतीनंच दहशतवाद्यांनी औरंगजेबाचा काटा काढल्याची आता चर्चा आहे.इंडियन एक्स्प्रेस रिपोर्टनुसार, या तिन्ही जवानांची ओळख आबिद वाणी, तज्जमुल अहमद आणि आदिल वाणीच्या स्वरूपात झाली आहे. यातील दोन जवान पुलवाम्याचे रहिवासी आहेत. तर एक जवान कुलगाम जिल्ह्यातील आहे. औरंगजेबाच्या हत्येदरम्यान यांच्यावर संशय व्यक्त करण्यात आला आहे.44च्या बटालियनच्या राष्ट्रीय रायफल्सचे जवान यांची दहशतवाद्यांनी हत्या केली होती. गेल्या वर्षी 15 जूनला ईद साजरी करण्यासाठी घरी जात असलेल्या औरंगजेब यांचं दहशतवाद्यांनी अपहरण केलं होतं. यानंतर त्यांची हत्या करण्यात आली. दहशतवाद्यांनी झाडलेल्या गोळ्यांनी छिन्नविच्छिन्न झालेला त्यांचा मृतदेह पुलवामा जिल्ह्यातील गुस्सू भागात सापडला होता. ईद साजरी करण्यासाठी सुट्टी घेतलेल्या औरंगजेब यांनी घरी जाण्यासाठी लष्करी तळावरुन टॅक्सी पकडली होती. ते दक्षिण काश्मीरच्या शोपियानचे रहिवासी होते.शोपियानला जात असलेल्या औरंगजेब यांची टॅक्सी दहशतवाद्यांनी कालम्पोरा गावाजवळ अडवली आणि त्यांचं अपहरण केलं. याची माहिती टॅक्सी चालकानं पोलिसांना दिली. यानंतर पोलीस आणि लष्करानं संयुक्तपणे शोधमोहीम सुरू केली. त्यावेळी औरंगजेब यांचा मृतदेह कालम्पोरापासून 10 किलोमीटर अंतरावर आढळून आला होता. दहशतवाद्यांनी अतिशय निर्घृणपणे त्यांची हत्या केली होती. औरंगजेब जम्मू-काश्मीर लाईट इन्फंटरीच्या शादीमार्ग येथे असलेल्या 44 राष्ट्रीय रायफल्समध्ये तैनात होते.
शहीद औरंगजेबाच्या हत्या प्रकरणात लष्कराचे तीन जवान ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2019 10:41 AM