नवी दिल्ली - देशात सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक डॉक्टर्स आपल्या कुटुंबीयांपासून दूर राहून अहोरात्र रुग्णांची सेवा करत आहेत. याच दरम्यान डॉक्टरांनी एक इतिहास रचला आहे. लडाखमधील गोठवणाऱ्या थंडीत तब्बल 16,000 फूट उंचीवर डॉक्टरांनी जवानावर यशस्वी शस्त्रक्रिया केल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पूर्व लडाखमधील एका सर्जिकल सेंटरमध्ये डॉक्टरांनी एका जवानावर अपेंडिक्सची (Appendix) यशस्वी शस्त्रक्रिया करून दाखवली आहे.
लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लडाखच्या फॉरवर्ड सर्जिकल सेंटरच्या सर्जिकल टीमने 16 हजार फूट उंचीवर कडाक्याच्या थंडीत आणि अत्यंत कठीण परिस्थितीत अपेंडिक्स काढण्यासाठी एक आपत्कालीन शस्त्रक्रिया केली. गोठवणारी थंडी व अत्यंत कठीण परिस्थिती असूनही डॉक्टरांनी यशस्वीरित्या शस्त्रक्रिया पार पाडली. शस्त्रक्रियेमुळे या जवानाचा जीव वाचला असून संबंधित जवानाची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.
एक लेफ्टनंट कर्नल, एक मेजर आणि कॅप्टनसह तीन डॉक्टरांच्या पथकाकडून ही शस्त्रक्रिया पार पाडली गेली. लडाखमधील वातावरणामुळे या जवानास हॅलिकॉप्टरद्वारे तिथून बाहेर काढणं शक्य होत नव्हतं. त्यामुळे अशा परिस्थिती डॉक्टरांच्या पथकास जवानाची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आणि ती यशस्वीरित्या केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोना रुग्णांसाठी वैद्यकिय क्षेत्रातील लोक अहोरात्र काम करत आहेत. अशीच एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे. कोरोना योद्धे आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा करत आहेत.
कोरोनाच्या संकटात रुग्णांची सेवा करता यावी यासाठी वयाच्या 87व्या वर्षी एका डॉक्टर आजोबांनी अनवाणी सायकल चालवून गरीब लोकांसाठी पुढाकार घेतला आहे. दररोज 10 किलोमीटर सायकलने प्रवास करत दारोदारी जाऊन ते गरीब लोकांना मदत करत आहेत. गरजुंवर उपचार करत आहेत. डॉ. रामचंद्र दांडेकर असं या महाराष्ट्रातील देवमाणसाचं नाव असून ते कोरोनाच्या या काळात रुग्णांची न थकता, न थांबता सेवा करत आहेत. दांडेकर आजोबा हे एक होमिओपॅथी डॉक्टर आहेत.
महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या 60 वर्षांपासून डॉ. रामचंद्र दांडेकर रुग्णांची सेवा करत आहेत. चंद्रपुरातल्या मूळ, पोम्भुर्णा आणि बल्लारशा या तीन तालुक्यांमधील गावात राहणाऱ्या लोकांपर्यंत ते मदतीसाठी पोहचतात. खेड्यापाड्यात राहणाऱ्या गरजू लोकांपर्यंत लवकर मदत पोहोचावी. त्यांना योग्य उपचार मिळावे यासाठी दांडेकर आजोबा सतत प्रयत्नशील असतात. दररोज ते आपल्या सायकलने अनवाणी फिरून गरीबांना मदत करत आहेत. ते दारोदारी जाऊन गरीब लोकांवर उपचार करतात. त्यांना औषधं देतात. गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांनी त्यांचं हे कार्य सुरूच ठेवलं आहे. वयाच्या 87 व्या वर्षी डॉक्टर आजोबा करत असलेल्या कामाला सर्वांनीच सलाम केला आहे.