ऑनलाइन लोकमत
भोपाल, दि. 14 - सैन्य बोलत नाही पराक्रम करतं, त्याप्रमाणे आपले रक्षामंत्रीपण बोलत नाहीत असं सांगत अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्जिकल स्ट्राईकचा उल्लेख करत कौतुक केलं आहे. मोदी झोपले आहेत, काही करत नाहीत अशी टीका होत होती असं सांगत मोदींनी विरोधकांना उत्तर दिलं आहे. शौर्य स्मारकाच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. यावेळी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर आणि मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहानदेखील उपस्थित होते.
श्रीनगरमध्ये जेव्हा पूर आला तेव्हा तेथील लोकांना मदत करताना जवानांनी हे आपल्यावर दगडफेक करणारे, हल्ला करणारे लोक आहेत असा विचार केला नाही. मदत करताना जवानांनी माणुसकी सोडली नाही असं सांगत मोदींनी जवानांचं कौतुक केलं. अनेक देशांकडे आपल्यापेक्षा जास्त सैन्यशक्ती असेल, पण सामान्य नागरिकांशी वागणूक, शिस्त यामध्ये आपले जवान पहिल्या क्रमांकावर असल्याचं मोदी बोलले आहेत.
जवानांनी फक्त शस्त्राच्या आधारे नाही तर नैतिकता, शिस्तीच्या आधारे आदर मिळवला आहे. येमेन येथे अनेक भारतीय अडकले होते, आम्ही मदतीसाठी जवानांना पाठवलं, सैन्याने पाच हजारांहून जास्त भारतीयांना परत आणलं. फक्त आपले नाही तर देशभरातील आणि पाकिस्तानमधील नागरिकांनाही वाचवलं असल्याचं मोदींनी सांगितलं. जवानांचं बलिदान आपणही कधी कधी विसरतो अशी खंत मोदींनी व्यक्त केली. तसंच जगाला वारंवार आपल्या बलिदानाची आठवून देण्याची गरज असल्याचंही मोदी बोलले आहेत.
आपल्याला शांत झोप लागावी यासाठी जवान जागे असतात. आपल्या झोपण्यावर सैन्याला आक्षेप नसतो पण कधी कधी तर जागेपणीही झोपलेलो असतो. फक्त जवान जागे राहिले तर त्यांच्यावर अन्याय असेल, जाग राहणं आपलंदेखील कर्तव्य आहे असं मोदी बोलले आहेत. मनोबल सैन्याचं सर्वात मोठं शस्त्र असून देशवासियांच्या एकतेमुळे, त्यांच्या पाठीशी उभे राहिल्याने त्यांना मनोबल मिळतं असं मोदींनी सांगितलं.
सत्तेत आल्यावर वन रँक वन पेन्शन लागू करण्याचं आश्वासन दिलं होतं त्याप्रमाणे आम्ही ते पुर्ण केलं. आधीच्या सरकारने फक्त आश्वासन दिली होती. काहींनी तर बजेटमध्येही टाकून दिलं होत पण काहीच केलं नसल्याचं सांगत मोदींनी विरोधकांवर टीका केली. वन रँक वन पेन्शन अंतर्गत आतापर्यंत साडे पाच हजार कोटी वाटण्यात आले आहेत अशी माहिती मोदींनी दिली.
सैन्यातून निवृत्त होणा-या जवानांना आता स्किल ट्रेनिंग देण्यात येणार आहे. जेणेकरुन निवृत्त झाल्यावर त्याच्या हाताला काम मिळेल, सरकारने यासाठी पाऊल उचललं आहे असंही मोदींनी सांगितलं.
यावेळी बोलताना संरक्षणंत्री मनोहर पर्रीकर यांनी सर्जिंकल स्ट्राईकचा उल्लेख करत योग्यवेळी कार्यक्रम होत असल्याचं बोलले आहेत. तर मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी शहिदांच्या कुटुंबाला प्रत्येक महिना पाच हजार रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा केली.