१५ वर्षांपासून लष्कराला एके-२०३ रायफल मिळेना; रशिया-युक्रेन युद्धामुळे उत्पादन आणखी लांबणीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 08:12 AM2022-12-26T08:12:30+5:302022-12-26T08:13:24+5:30
उत्तर प्रदेशच्या अमेठीतील एके-२०३ असॉल्ट रायफल्सचा प्लांट रखडल्याने भारतीय लष्कराची हलक्या स्वदेशी असॉल्ट रायफलची प्रतीक्षा आणखी वाढली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली :उत्तर प्रदेशच्या अमेठीतील एके-२०३ असॉल्ट रायफल्सचा प्लांट रखडल्याने भारतीय लष्कराची हलक्या स्वदेशी असॉल्ट रायफलची प्रतीक्षा आणखी वाढली आहे. भारतीय जवान १५ वर्षांपासून या कलाश्निकोव्ह सीरिजच्या शस्त्राच्या प्रतीक्षेत आहेत. रशिया व युक्रेनमधील युद्धामुळे हा प्लांट सुरू होऊ शकला नाही. या दोन देशांत गेल्या ३०० दिवसांपासून युद्ध सुरू आहे. अमेठीतील कोरवा येथे असलेल्या कोरवा ऑर्डनन्स फॅक्टरी परिसरात सध्या इंडो-रशिया रायफल्स प्रायव्हेट लिमिटेड (आयआरआरपीएल) प्लांटचे बांधकाम सुरू आहे.
पुढील वर्षी उत्पादन सुरू होईल
शस्त्रास्त्र कारखान्याचे दोन-तीन हॉल येथे आधीच तयार आहेत. रायफल चाचणीसाठी इनडोअर फायरिंग रेंजसह उत्पादन लाइनचे बांधकामही सुरू आहे. आयआरआरपीएलमध्ये रशियन अभियंते आणि कुशल कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली आहे. आता रायफलचे उत्पादन २०२३ मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी माहिती देताना सांगितले.
थेट पुरवठ्यास विलंब
- कोरवा कारखान्यात २०२२ च्या अखेरीस एके-२०३ चे उत्पादन सुरू होणार होते. याला थोडा उशीर झाला आहे. सध्या लष्कराच्या तिन्ही शाखांत सुमारे ८ लाख स्वदेशी इंसास (इंडियन स्मॉल आर्म्स सिस्टम) रायफली आहेत. या करारांतर्गत इंसासऐवजी २० हजार एके-२०३ ची पहिली खेप थेट रशियातून येणार आहे.
- युक्रेनसोबतच्या युद्धामुळेही त्यालाही विलंब होत आहे. हा दहा वर्षांचा प्रकल्प आहे. १.२० लाख रायफल्सनंतर पूर्णपणे स्वदेशी रायफल तयार होईल.
विलंबाची इतर २ कारणे
- टेक ट्रान्सफर : भारताला तंत्रज्ञान हस्तांतरणानंतर १०० टक्के स्वदेशीकरण हवे आहे. रशियाला फक्त ६० टक्के मान्य आहे.
- दर : ही रायफल ८० ते ९० हजार रुपयांना पडेल. भारताला या रायफलचे दर कमी करायचे आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"